राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत त्यांच्या मुलाच्या कार्यालयाजवळ हत्या करण्यात आली होती. या हत्येमागील तपास अजूनही सुरूच आहे. अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील या नेत्याला सुद्धा लक्ष्य करण्यात येणार होते, असा दावा अधिकाऱ्याने केला आहे. बिश्नोई गँगेच्या प्लॅन बी मधील शूटर्सला ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.
पुणे पोलीस अलर्ट
मुंबई गुन्हे शाखेने याप्रकरणात पुण्यात एक पिस्तूल जप्त केले होते. त्याआधारे ही हत्या करण्यात आली होती. सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांना बिश्नोई गँगच्या पुणे प्लॅनची माहिती मिळाली. ही माहिती संवेदनशील असल्याने पोलिसांनी या नेत्याचे नाव जाहीर केले नाही. मुंबई पोलिसांनी याविषयीची इत्यंभूत माहिती पुणे पोलिसांना दिली आहे. पुणे पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. आरोपींनी या नेत्याच्या घराची आणि परिसराची, त्याच्या कार्यालयाची रेकी केली होती की नाही, याचा तपास पोलीस करत आहेत.
12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकींची हत्या
बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात मोठे प्रस्थ असलेल्या बाबा सिद्दिकीची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली, यासंबंधी अनेक चर्चा आहे. त्यात सलमान खान याच्या जवळीकतेमुळे ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जाते. 12 ऑक्टोबर रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती. ते मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडले होते. ते घरी जाण्याच्या तयारीत होते. तर काही कारणांमुळे झिशान कार्यालयात परतले होते. बाबा सिद्दिकी घराकडे जाण्यासाठी वळले तेव्हा त्यांच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांना वाचवण्यात यश आले नाही.
या हत्येनंतर मुंबई पोलिसांनी व्यापक तपास मोहिम हाती घेतली. या प्रकरणाचे धागेदोर उत्तर भारतातील हरयाणा, पंजाबपर्यंत दिसून आले. या हत्येनंतर समाज माध्यमावर ही हत्या बिश्नोई गँगने घडवून आणल्याचा दावा करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणा दहाहून अधिक जणांना अटक केली आहे.