अहमदनगर / 1 ऑगस्ट 2023 : उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दोघांनी दुकानदाराला शिवीगाळ करत दुकानाची तोडफोड केल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक चौधरी आणि राजू गोविंद लांबे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात भादवी कलम 323, 504, 427 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर गावातील हनुमानवाडी येथे रावसाहेब नेमाने यांचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानातून आरोपींनी उधारीवर सामान घेतले होते. या सामानाचे उधारीचे 300 रुपये आरोपींनी अद्याप दिले होते. यामुळे नेमाने यांनी आरोपींकडे उधारीचे 300 रुपये मागितले. मात्र आरोपींना उधारी मागितल्याचा राग आला. याच रागातून आरोपींनी दुकानदार नेमाने यांना शिवीगाळ करत दुकानाची तोडफोड केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दुकानदार रावसाहेब नेमाने यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नेमाने यांच्या तक्रारीवरुन आणि सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.