मुंबई / गोविंद ठाकूर : पैशावरुन वाद घातला म्हणून दुकानदाराने तृतीयपंथीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना कांदिवली येथे घडली. याप्रकरणी आरोपी दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. भागवत प्रद्युम्न चौहान असे अटक करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे. जखमी तृतीयपंथीयाला नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. हल्ला केल्यानंतर आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेला. कांदिवली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील आझमगड येथून दुकानदाराला बेड्या ठोकल्या आहेत. कांदिवली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
कांदिवली पश्चिम लालजी पाडा 90 फूट रोडवर भागवत चौहाने याचे नारळपाणीचे दुकान आहे. मालवणी येथील रहिवासी तृतीयपंथी रीना शेख ही दुकानदारांकडून पैसे मागत होती. तिने चौहान याच्याकडे 5 रुपये मागितले, पण दुकानदाराने केवळ 2 रुपये दिले. यावरुन तृतीयपंथी रीनाने चौहानसोबत वाद घालण्यास आणि टाळ्या वाजवण्यास सुरवात केली.
या वादामुळे संतप्त झालेल्या दुकान मालकाने रीनावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तृतीयपंथीच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर स्थानिक लोकांनी तृतीयपंथीला जवळच्या ऑस्कर रुग्णालयात दाखल केले. मात्र तृतीयपंथीयाची प्रकृती गंभीर असल्याने तिला केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी उत्तर प्रदेशातील आझमगड येथे त्याच्या मामाच्या घरी असल्याचे कळले. पोलिसांनी अनेक पथके तयार करून आरोपी भागवत प्रद्युमन चौहान याला देवगाव आझमगड उत्तर प्रदेश येथून अटक केली. पुढील तपास कांदिवली पोलीस करत आहेत.