दिल्ली : श्रद्धा हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. नार्को टेस्टमध्ये आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकर हिची हत्या केल्याची पुन्हा एकदा कबुली दिली. शिवाय तिच्या शरीराचे तुकडे ज्या हत्याराने केले, त्या हत्यारांबाबतही उत्तर दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टीव्ही 9 भारतवर्षचे प्रतिनिधी जितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन तास चाललेल्या नार्को टेस्टमधून फॉरेन्सिक टीमला काही महत्त्वाचे सुगावे हाती लागलेत. ज्यामुळे या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना अधिक मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.
ज्या हत्याराने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे आफताबने केले, ती हत्यारं त्याने कुठे फेकली, याचंही उत्तर आफताब पुनावाला याने नार्को टेस्टदरम्यान दिलं. त्याने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली असल्याचंही कबुल केलं.
श्रद्धाचा फोन आणि तिचे कपडे त्याने कुठे फेकले, याचाही उत्तर त्याने यावेळी दिली. या नार्को टेस्टचा रिपोर्ट पोलिसांना येत्या दोन मिळण्याची शक्यता आहे. त्या रिपोर्टनंतर या हत्याकांडाशी संबंधिक अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तर स्पष्ट होणार आहेत.
आफताब पुनावाल याची नार्कोट टेस्ट यशस्वीरीत्या पार पडली असून या टेस्टमधून मिळालेली उत्तर हत्याकांडाचं गूढ उकलण्यात फायदेशीर ठरणार आहेत, असं दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी सागर प्रीत हुड्डा यांनी म्हटलंय.
दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात ही नार्को टेस्ट पार पडली. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 12 वाजपर्यंत ही टेस्ट चालली. या टेस्टआधी आफताबची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. तसंच रुग्णालय परिसरात चोख बंदबस्तदेखील ठेवण्यात आलेला.
नार्को टेस्टआधी दिल्या गेलेल्या एनेस्थेशियामुळे आफताब पुनावाला प्रचंड गुंगीत होता. झोपेच्या अवस्थेत असलेल्या आणि ग्लानी आलेल्या आफताबच्या गालावर आणि मानेवर हाताने हळू चापट्या मारुन त्याला यावेळी प्रश्नोत्तर करण्यात आलं. त्याने दिलेली उत्तर किती घरी ठरतात, हे देखील आता पोलीस तपासातून समोर येईल.
श्रद्धाचं शिर, तिचा मोबाईल, हत्येदरम्यान वापरलेली शस्त्र आणि हत्येनवेळी तिने घातलेले कपडे, हे आफताब याने कुठे फेकलं, याच्या पोलीस शोधात आहेत. या गोष्टी हाती लागल्या तर श्रद्धाच्या हत्याकांडप्रकरणाच्या तपासाचं गूढ उकलण्यात मोठी भर पडणार आहे.