मुंबई : श्रद्धा हत्याकांड प्रकरणी आता नवनवीन खुलासे होत आहेत. श्रद्धाच्या लिव्ह इन पार्टनरनेच तिची दिल्ली येथे क्रूर हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे 35 तुकडे करत जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. हत्येचा खुलासा झाल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले. या सर्व घटनेत सर्वाधिक धक्का बसला तो श्रद्धाच्या वडिलांना. मुलीने आपले म्हणणे ऐकले असते, तर ती आज जिवंत असती असे श्रद्धाच्या वडिलांचे म्हणणे आहे.
मुलीला खूप समजावले, मात्र तिने ऐकले नाही. ती आपल्या जिद्दीवर अडून बसली होती, असे श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी सांगितले.
श्रद्धा आणि आफताबच्या रिलेशनशीपबद्दल त्यांना 18 महिन्यांनंतर माहिती झाले होते. श्रद्धाने 2019 मध्ये तिच्या आईला आपल्या रिलेशनशीपबाबत सांगितले होते. याला श्रद्धाच्या आई-वडिलांनी विरोध केला होता.
यामुळे नाराज झालेल्या श्रद्धाने आई-वडिलांना सांगितले की, मी आता 25 वर्षाची झाले आहे. मला माझे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आफताबसोबत लिव्ह इन मध्ये रहायचे आहे.
यानंतर श्रद्धा घरातून निघून जाऊ लागली. यावेळी तिच्या आईने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ती ऐकली नाही आणि आफताबसोबत निघून गेली.
श्रद्धाच्या या निर्णयामुळे तिच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला. ती सतत आजारी पडू लागली आणि 2021 मध्ये तिचा मृत्यू झाला. आईच्या मृ्त्यनंतर श्रद्धाचं आपल्याशी एक-दोन वेळा बोलणं झालं होतं. श्रद्धाच्या मित्र-मैत्रिणींकडून तिची माहिती मिळायची.
तिने सांगितले होते की, आफताब आणि तिच्या नात्यात कटुता निर्माण झाली आहे. त्यानंतर ती एकदा घरीही आली होती. त्यावेळी तिने सांगितले होते की, आफताब तिला मारहाण करतो. तेव्हा मी तिला घरी परतण्यास सांगितले होते. मात्र आफताबने तिची समजूत काढत तिला पुन्हा सोबत नेले.
श्रद्धाच्या मित्राने सांगितले की, तिचा फोन बंद आहे. तेव्हा आम्ही पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. श्रद्धाच्या वडिलांनी पुढे सांगितले की, श्रद्धाचे मित्र-मैत्रिण शिवानी माथरे आणि लक्ष्मण नडार यांनी सांगितले की, श्रद्धा आणि आफताब यांच्यात चांगले संबंध नाहीत. आफताब तिला मारहाण करतो.
मी तिला अनेक वेळा समजावले होते, पण तिने माझे ऐकले नाही. त्यामुळे मी तिच्याशी बातचीत केली नाही. याच दरम्यान, श्रद्धाचा मित्र श्रीजयने 14 सप्टेंबर रोजी माझा मुलगा श्रीजयला सांगितले की, श्रद्धाचा फोन दोन महिन्यांपासून बंद येत आहे.
दुसऱ्या दिवशी मी मुलासोबत बोललो तेव्हा त्याने मला श्रद्धाचा फोन बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर मी लक्ष्मणसोबत बोललो आणि माणिकपूर पोलीस ठाण्यात श्रद्धा बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
त्यानंतर श्रद्धा आफताबसोबत दिल्लीत राहत असल्याची माहिती मिळाली. मग आम्ही दिल्लीतील महरौली पोलीस ठाण्यात आफताब विरोधात माझ्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवली.
पोलिसांनी आफताबची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिल्याचे मंगळवारी पोलिसांनी सांगितले.पोलिसांचा दावा आहे की श्रद्धाची हत्या मे मध्ये झाली. तर लक्ष्मण नडरने सांगितले की, जुलैमध्ये श्रद्धाशी त्याचे बोलणे झाले. यामुळे श्रद्धाची हत्या नेमकी कधी झाली हे रहस्य बनले आहे.