नवी दिल्ली | 4 सप्टेंबर 2023 : रक्षा बंधनाचा (raksha bandhan) सण गेल्याच आठवड्यात पार पडला. भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या नात्याचा असलेला हा सण सगळीकडे आनंदात साजरा झाला. मात्र दिल्लीत याच सणाच्या दिवशी असा एक प्रकार घडला जे वाचून तुम्हालाही प्रश्न पडेल की हे कसले रक्षाबंधन ? खरंतर या दिवशी बहीण भावाला राखी बांधून मिठाई भरवते आणि भाऊ तिचं जन्मभर रक्षण करण्याचं वचन देतो. पण आजकाल बदलत्या काळानुसार, गिफ्ट्सची देवणाघेवाण होते. मात्र दिल्लीत याच रक्षबंधनाच्या दिवशी गिफ्ट किंवा शगुनावरून झालेला वाद एवढा पेटला की त्याचा शेवट अतिशय हिंसक आणि दु:खद झाला. तीन बहिणींनी मिळून त्यांच्याच वहिनीला बेदम मारहाण (beat up woman) केली. त्यामध्ये ती महिला जबर जखमी झाली, एवढी की तिला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाचून धक्का बसला ना, चला जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय….
राखी बांधण्यावरून सुरू झाला वाद
खरंतर रक्षाबंधनाच्या दिवशी, बहिणी त्यांच्या लाडक्या भावाल राखी बांधण्यासाठी त्याच्या घरी पोहोचल्या. सगळं नीट सुरू होतं, पण राखी बांधायची वेळ आल्यावर वाद सुरू झाला. पहिले राखी कोण बांधणार यावरून भांडण झालं आणि त्यानंतर तर बहिणींनी भावाकडे भेट म्हणून चक्क 21-21 हजार रुपये मागितले. भावाने पैसे दिले नाहीत, म्हणून त्या नाराज झाल्या आणि त्यांनी वहिनीशी वाद घालायला सुरूवात केली. ते प्रकरण एवढं वाढलं की त्यांनी सरळ तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. पीडित महिलेने पोलिसांना घरी बोलावण्याचा प्रयत्न केला असता कुटुंबातील इतर महिलांनीही तिला मारहाण केली. यामध्ये पीडित महिला गंभीर जखमी झाली आणि तिला उपचारांसाठी एम्स रुग्णालयात नेण्यात आले.
रुग्णालयात दाखल झाली पीडित महिला
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला नर्स म्हणून काम करते. तिच्या तीन नणंदा राखीसाठी घरी आल्या. पण भावाने मनाजोगती रक्कम दिली नाही म्हणून त्यांनी त्याचा राग वहिनीवर काढत तिला बेदम मारले. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे सर्वच अवाक् झाले. सध्या पीडिच महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.