लखनऊ | 27 जुलै 2023 : होळीच्या रंगात नाहून निघालेल्या गावात अचानक एका घटनेमुळे रंगाचा बेरंग झाला. शुल्लक कारणावारून झालेल्या वादानंतर दोन तरूणांच्या (murder) झालेल्या हत्येने संपूर्ण गाव हादरलं. आठ वर्षांपासून त्यांचे कुटुंबीय न्यायाची प्रतीक्षा करत होते. अखेर आज त्यांना न्याय मिळाला आणि मारेकरी पिता-पुत्र दोषी ठरले.
उत्तर प्रदेशातील पीलभीत येथील दुहेरी हत्याकांडातील ((Double murder case) सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या सहा जणांमध्ये पिता-पुत्राचाही समावेश आहे. खरंतर हे प्रकरण ८ वर्षांपूर्वीचं आहे, तेव्हापासून मृताचे कुटुंबिय न्यायाची वाट बघत होते. अखेर आज आरोपींना दोषी ठरवत शिक्षा मिळाल्याने त्यांनी सुखाचा श्वास घेतला.
2015 साली देवरिया कोतवाली परिसरातील आंदा गावात होळीच्या दिवशी दोन तरूणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नृत्य करण्यास नकार दिल्याच्या शुल्लक कारणावरून हे हत्याकांड झालं. याच गावात राहणारे अरविंद, मुनेंद्र, केशव, राहुल यांनी कल्लू नावाच्या इसमाला डान्स करण्यास सांगितले होते, मात्र कल्लूने नाचण्यास सरळ नकार दिला. यामुळे ते सर्व संतापले आणि अरविंद, मुनेंद्र, केशव, राहुल रजनीश यांच्यासह केदारनाथ या इसमाने त्याच गावातील नन्हेलाल याच्या घराजवळ कल्लूला घेराव घातला. आणि कल्लूवर गोळ्या झाडल्या.
गंभीर जखमी झालेला कल्लू जमीनीवर कोसळला. गोळ्यांचा आवाज ऐकून वेद प्रकाश हा कल्लूला वाचवण्यासाठी पुढे सरसावला इतक्यात केदारनाथ याने वेदप्रकाशवरही गोळी झाडली. या दुर्दैवी घटनेत त्या दोघांचाही मृत्यू झाला.
न्यायालयाने जन्मठेपेसह ठोठावला दंड
याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने तब्बल ८ वर्षांनी या प्रकरणात पिता-पुत्रासह ६ जणांना दोषी ठरवले. न्यायाधीशांनी या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि दंडही ठोठावला. मृत तरूणांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलांना न्याय मिळावा यासाठी सतत 8 वर्षे न्यायालयात दाद मागितली. अखेर आज त्यांना न्याय मिळाला.