सोलापूर : सोलापुरातील सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ लहान बाळ बेवारस अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारमधून आलेल्या चार पुरुष आणि एका महिलेने बाळ मंदिराजवळ सोडून पोबारा केला. आठ ते दहा दिवसांचे पुरुष जातीचे हे नवजात अर्भक आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडी-पंढरपूर रस्त्यावरील बावी येथील मंदिरात ही घटना घडली. आज (सोमवार) सकाळी आठ ते दहा दिवसांचे पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हा चर्चेचा विषय बनला आहे.
नेमकं काय घडलं?
सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बावी येथील सिद्धेश्वरच्या मंदिराजवळ एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी आली होती. या गाडीतून चार पुरुष आणि एक महिला हातात लहान बाळाला घेऊन उतरले. मंदिरात जाऊन ते लहान बाळ तिथेच सोडून, आलेल्या गाडीतून कुर्डूवाडीच्या दिशेने ते घाई गडबडीने निघून गेले. स्थानिक नागरिक येईपर्यंत ते पसार झाले होते.
बाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात
या घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील यांना देऊन त्या लहान बाळाला तातडीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना परिसरात समजताच तर्कवितर्क चर्चांना उधाण आले आहे. तर या घटनेने “माता न तू वैरीणी’ अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पुण्यात बाळाला झुडपात सोडणारी आई अटकेत
गेल्या वर्षी पुण्यातील चांदणी चौकातील झुडपात चार महिन्यांच्या बाळाला सोडून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र या पाषाणहृदयी आईला कोथरुड पोलिसांनी अवघ्या काही तासात अटकही केली होती. महिला वारंवार चिडून घर सोडून जात असल्याची माहिती तिच्या पतीने दिली होती. अंगात फुल बाह्यांचा निळा शर्ट, त्यावर एक पांढरा शर्ट, गुलाबी फुल पँट, पायात मोजे, थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून अंगावर पांघरलेली निळी शाल असे सर्व तऱ्हेने सुरक्षित असलेले चार महिन्याचे बाळ एका झुडपाखाली ठेवले होते.
संबंधित बातम्या
चार महिन्यांच्या बाळाला झुडपात सोडणारी पुण्याची पाषाणहृदयी आई अटकेत
(Solapur Baby Boy found near Siddheshwar Temple)