सोलापूर : जिल्ह्यातील फटाका कारखान्याला 1 जानेवारी 2023 रोजी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटातील मुख्य संशयित आरोपी फरार असल्याने पोलीस त्याच्या शोधात होते. हा संशयित वेशभूषा बदलून पोलिसांना चकवा देत होता. पण हे नाटक फार दिवस चाललं नाही. अनेक दिवसांच्या चकव्यानंतर अखेर संशयित पोलिसांच्या हाती लागला. अखेर पोलिसांनी या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या संशयिताचं नाव हे नाना पाटेकर ( रा. उस्मानाबाद) असं आहे.
नक्की काय घडलं होतं?
जिल्ह्यातील बार्शीतील शिराळे पांगरीतील कारखान्यात नववर्षाची ‘धुमधडाक्याने’ सुरुवात झाली. या भीषण स्फोटामध्ये 5 महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 महिला या स्फोटात गंभीर जखमी झाल्या होत्या. या प्रकरणात पांगारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात 3 संशयित आरोपींना अटक केली होती.
मात्र यानंतरही पोलिसांना शोध होता तो नानाचा. नानाला शोधण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडलं. दुसऱ्या बाजूला नानादेखील थेट दक्षिणेतील तामिळनाडूतील विविध ठिकाणी वेषांतर करुन फिरत होता. त्यामुळे पोलिसांना त्याला शोधण्यात वेळ लागला. मात्र पोलिसांनी शोधून काढलंच. पोलिसांनी थेट तामिळनाडूत नानाची फिल्डिंग लावत मुसक्या आवळल्या.
सोलापूर गुन्हा शाखेने अत्यंत शिताफीने, सतर्कतेने आणि तितक्याच जबाबदारीने ही जबाबदारी पार पाडली. आरोपी नानाचा शोध घेण्यासाठी आपली सुत्र हलवलीत. यामध्ये त्यांना लक्षात आलं की आरोपी नाना आऊट ऑफ द स्टेट गेल्याची लिंक लागली. पोलिसांनी तामिळनाडूमध्ये जावून शिवकाशी, मदुराई आणि कौईम्बतुर या जिल्ह्यांमधील माहिती मिळवत नाना पाटेकरचा ठावठिकाणा जाणून घेतला.
आरोपा नानाच्या ठिकाणाची माहिती झाल्यावर पोलिसांनी सापळा रचला. शिवकाशीमधून त्याला ताब्यात घेतलं असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकूल यांनी आपल्या टीमसह ही कामगिरी फत्ते केली.
दरम्यान, आरोपी नाना शिवाजी पाटेकरला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. त्यानंतर न्यायालयाने आरोपी नानाला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.