सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा (Solapur Murder) तालुक्यात खळबळजनक घटना घडली. घरात झोपलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर उकळतं तेल टाकून खून (Madha Farmer Murder)करण्यात आलाय. माढा (Solapur Crime News) तालुक्यातील सापटणे गावात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरुन गेलाय. जमिनीच्या व रस्त्याच्या किरकोळ वादातून सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. शहाजी गोविंद ढवळे असं खून झालेल्या शेतकऱ्याचं नाव असून ते 55 वर्षांचे होते. टेभुर्णी पोलिसांत संतोष राजेंद्र ढवळे, नरसिंह राजेंद्र ढवळे या दोघांवर या शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. मृत शहाजी ढवळे हे सोमवारी रात्री आपल्या घरात झोपले होते. दीडच्या सुमारास त्यांच्या पत्नी अनिता या शेतात पाणी देण्यासाठी गेल्या होत्या.त्यामुळे घराचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी दोघांनी घरात येऊन ढवळे यांच्या अंगावर तापलेले तेल टाकले.यात ते गंभीर जखमी झाले आणी त्याचा मृत्यु झाला.
शेतकरी ढवळे हे झोपेत असताना त्यांच्याच घरात जाऊन जीवघेणा हल्ला करण्यात आला. गॅसवर तेल गरम करुन दोघांनी ढवळे यांच्या अंगावर ओतलं. यावेळी झोपेत असलेल्या ढवळेंना या भ्याड हल्ल्यातून स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळू शकली नाही.
शहाजी ढवळे यांचा संतोष ढवळे व नरसिंह ढवळे यांच्या बरोबर एक जुना खटला कोर्टात चालू आहे. तसेच त्यांच्यात जमिनीचा व रस्त्याचा वाद आहे. याच वादाचा राग मनात धरुन संतोष व नरहरी ढवळे या दोघा बंधूनी ढवळे यांची हत्या केली. अंगावर तेल ओतल्याने यात शेतकरी ढवळे यांचे तोंड, हात, छाती, मांडी, पाय गंभीररीत्या भाजले गेले. उकळणारं तेल अंगावर आल्यानं शेतकरी शहाजी ढवळे हे होरपळले. जखमी झालेल्या ढवळे यांना उपचारासाठी रुग्णलयामध्ये घेऊन जाण्यात आलं. पण तिथं त्यांचा मृत्यू झाला.
आता याप्रकरणी दोघा बंधूंना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास केला जातो आहे. अटक करण्यात आलेल्या नरसिंह आणि संतोष यांची कसून चौकशी केली जातेय. तर पतीच्या मृत्यूनं पत्नी अनिता ढवळे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेनं संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरुन गेलाय. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातही कचरा वेचणाऱ्यांवर उकळतं पाणी फेकण्यात आलं होतं. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररीत्या जखमी झाल्याचं समोर आलं होतं.