पत्नी नांदायला येत नसल्याचा राग, सुपारी देऊन पतीनेच केली पत्नीची हत्या

| Updated on: Jul 23, 2024 | 4:02 PM

बिभीषण याने कोमलची सुपारी देऊन तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने ही हत्या का केली? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पत्नी नांदायला येत नसल्याचा राग, सुपारी देऊन पतीनेच केली पत्नीची हत्या
Follow us on

Solapur Crime Story : सुपारी देऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. कोमल मत्रे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयित आरोपींना अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातील करमाळा परिसरातील पोंधवडीमध्ये राहणाऱ्या बिभीषण उर्फ पिन्या विलास मत्रे याचा विवाह कोमल वाघ हिच्याशी झाला होता. २०१७ मध्ये बिभीषण आणि कोमल लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या तीन वर्षांनी कोमल ही माहेरी आली. त्यानंतर तिने बिभीषणसोबत संसार करण्यास नकार दिला. तसेच ती पोंधवडीमध्ये राहण्यासही गेली नाही. यानंतर बिभीषणने कोमलच्या वडीलांना सातत्याने माझ्या पत्नीला नांदायला का पाठवत नाहीत, अशी विचारणा केली. यावेळी त्याने कोमलच्या वडीलांना मारहाणही केली होती.

कोयत्याने गंभीर वार

याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. यानंतर आता 16 जुलैला कोमल तिची आई अलका यांच्यासोबत घरात बसले होते. तर कोमलचा भाऊ तानाजी आणि त्याची पत्नी शोभा दुसऱ्या खोलीत होते. यावेळी काही अनोळखी व्यक्तींनी मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी लावली. यानंतर तिच्या आईने आणि तिने दरवाजाला जोरजोरात धडक दिली. यात दरवाजाची कडी तुटल्याने आरोपींनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. यानंतर कोमलच्या डोक्यात पाठीमागून कोयत्याने गंभीर वार करण्यात आले. यातच तिचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

याप्रकरणी कोमलची आई अलकाबाई सौदागर वाघ यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मंगळवारी कोमल, तिचा मुलगा, सुन हे घरी असताना रात्री साडेआठच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती हातात कोयते घेऊन आले. त्यांनी कोमलच्या पाठीमागून वार केले, अशी तक्रार त्यांनी पोलिसात दिली होती. करमाळा पोलिसांनी याबद्दल गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक विनोद घुगे हे या प्रकरणाचा तपास करत होते.

पोलिसांकडून 6 जणांना अटक

यावेळी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. बिभीषण याने कोमलची सुपारी देऊन तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने ही हत्या का केली? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणात सहा संशयित आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणात संशयित आरोपी पती बिभीषण मत्रे याला अटक करण्यात आली आहे. त्यासोबतच रोहन प्रदीप मोरे, सुनिल उर्फ काका विष्णू शिंदे, प्रदिप उर्फ दीपक सुनिल हिरभगत, विशाल उर्फ सोन्या परशुराम सवाणे आणि ऋषिकेश उर्फ बच्चन अनिल शिंदे यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या सर्वांना अटक केली असून सध्या याचा तपास सुरु आहे.