सोलापूर : सोलापुरातील मोहोळमध्ये शिवसैनिकांची दुहेरी हत्या केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या बाईकवर टेम्पो घालून अपघात असल्याचं भासवत हत्या करण्यात आली होती. कर्नाटक राज्यात लपून बसलेल्या 5 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शिवसैनिक विजय सरवदे आणि सतीश क्षीरसागर यांचा अपघाताच्या आडून खून झाला होता.
संतोष सुरवसे, रोहित फडतरे, पिंटू सुरवसे, आकाश बरकडे आणि संदीप सरवदे अशी आरोपींची नावे आहेत. नगरपरिषदेच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केल्याचा प्रकार 15 जुलै 2021 रोजी समोर आला होता. बाईकने जाणाऱ्या दोघा शिवसैनिकांवर पाठीमागून टेम्पो घातल्याने सतीश नारायण क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या विजय सरवदे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित उर्फ अनिल फडतरे, पिंटू सुरवसे, टेम्पो चालक भैय्या अस्वले या चौघांच्या विरोधात त्यावेळीच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी टेम्पो चालक भैय्या अस्वले याला 15 जुलैलाच अटक करण्यात आली होती.
बोगस मतदार नोंदणीच्या तक्रारीचा राग
चार महिन्यांपूर्वी सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या कारणावरून सिद्धार्थ नगर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सतीश नारायण क्षीरसागर आणि विजय सरवदे या दोघांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरुन प्रांताधिकाऱ्यांनी सुनावणी केली होती. त्यानंतर बोगस नावे कमी करण्यात आली होती.
याशिवाय, रमाई आवास योजनेच्या 28 मंजूर गायब फाईलींबाबतही शिवसेनेच्या या दोघा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या सर्व गोष्टींचा राग मनात धरुन संशयित आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती आहे. सोलापूर ग्रामीणच्या मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
बाईकवर टेम्पो घातला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोलापुरात शिवसैनिकाची हत्या
शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या; 24 तासात दोन हत्येच्या घटनांनी लोणावळा हादरलं
डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्राने वार, अमरावतीत शिवसेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या
रायगडमध्ये राजकीय पूर्ववैमनस्यातून शिवसैनिकाची हत्या
(Solapur Mohol Shivsainik Shivsena volunteer Murder Case NCP workers arrested from Karnataka)