मध्यप्रदेश : ज्यांना भूत प्रेत यांचा त्रास होत आहे त्यांनी मूठ बांधावी असा बाबांनी आदेश दिला. तो आदेश येता क्षणीच काही मुठी आपोआप वळल्या. बाबांनी मंत्र पठण करण्यास सुरुवात केली. अनेक लोक विचित्र आवाज करत इकडे तिकडे धावू लागले. अनेक महिलांनी आपले केस मोकळे सोडले. हळूहळू नाचत त्या मुख्य मंडपात आल्या. जोरजोरात नाचू लागल्या. त्यांनी सुरक्षेसाठी उभारलेले स्टेजजवळील बॅरिकेडिंग ढकलायला सुरुवात केली. हा हू आवाज करत त्या इकडे तिकडे धावत राहिल्या आणि अचानक पुन्हा आदेश आला.
मध्यप्रदेशमधील राजगड जिल्ह्यात खिलचीपूर येथे ही घटना घडलीय. बागेश्वर धाम येथे पं. धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी 26 जून ते 28 जून असे तीन दिवसीय हनुमत कथा प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एकीकडे प्रवचन सुरु असतानाच बाबांनी दरबारही भरवला होता. या दरबाराला हजारो लोक उपस्थित होते.
तीन दिवसीय हनुमत कथेच्या दुसऱ्या दिवशी दरबारात लोकांची मोठी गर्दी झाली. बाबा बागेश्वर यांच्याकडे मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष आपल्या समस्या घेऊन दरबारात पोहोचल्या होत्या. बाबा बागेश्वर यांनी मंचावरून ज्यांना दुष्ट आत्माचा त्रास आहे त्यांनी आपला हात उंच करावा. आपली मुठ घट्ट पकडावी असे आदेश दिले.
त्यांच्या या आदेशानंतर शेकडो हात उंचावले. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री ( बाबा बागेश्वर) यांनी श्री राम मंत्राचे पठण सुरू केले. मंत्राचे पठण सुरु असतानाच अचानक अनेक लोक विचित्र आवाज करत इकडे तिकडे धावू लागले. अनेक स्त्रिया आपले केस सोडून मंडपामध्ये घुमू लागल्या. जोरजोरात चित्र विचित्र पद्धतीने नाचू लागल्या.
महिलांनी बागेश्वर बाबा यांच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या स्टेजजवळील बॅरिकेडिंग ढकलण्यास सुरुवात केली. हा, हू असा आवाज करत त्या इकडे तिकडे धावू लागल्या. याच दरम्यान, धिरेंद्र शास्त्री यांनी मंचावरूनच सेवकांनी दरबारात यावे. ज्यांच्या अंगात भूत आले आहे त्यांच्या डोक्यावर वार करा. भूताला आग लावा. त्याला बेड्या ठोका असे आदेश दिले. त्यानंतर आपली काठी फिरवत ते मंत्र म्हणू लागले. आज सैन्य पोहोचेल. ज्यांच्यावर वाईट शक्ती आहे त्यांना मारहाण केली जाईल असे ते म्हणाले.
बागेश्वर बाबा यांच्या या विचित्र कृतीनंतर त्यांच्यावर आता अनेक आरोप होत आहेत. दैवी शक्ती वगैरे काही नसून हे केवळ अंधश्रद्धा पसरविण्याचे काम बागेश्वर बाबा करत आहेत. त्यांच्या अशा कृतीमुळे समाजामध्ये नाहक गैरसमज पसरविले जात आहेत अशी टीकाही त्यांच्यावर होऊ लागली आहे.