नदिया : पैशाच्या हव्यासातून कोण काय करेल, याचा नेम नाही. अशावेळी रक्ताच्या नात्याचा देखील लोकांना विसर पडतो. पैसा हा कळीचा मुख्य कारण असते. अनेकदा आपल्या दैनंदिन जीवनात पैशाच्याच कारणावरून वाद किंवा रक्तरंजित घटना घडल्याचे आपण पाहत असतो. अशीच एक पैशाच्या हव्यासातून पश्चिम बंगालमध्ये घडलेली धक्कादायक घटना उजेडात आली आहे. येथील नदिया जिल्ह्यातील नवद्वीप परिसरामध्ये एका महिलेने तब्बल 75 लाख रुपयांची लॉटरी जिंकली होती. तिच्या या लॉटरीच्या पैशाच्या हव्यासातून महिलेच्या मुलानेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रेयसीच्या मदतीने त्याने आपल्या जन्मदात्रीची हत्या केली.
सुप्रिया साहा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. हत्या प्रकरणात नवद्वीप पोलिसांनी स्वतःच्या मुलासह त्याची प्रेयसी आणि अन्य दोघांना अटक केली आहे. कुणाल हलदर, नयन मालाकार आणि शुक्ला बिस्वास अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये या आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले. हत्येचा कट रचण्यामागे शुक्ला पुरी ही मास्टरमाईंड होती, अशी माहिती पोलीस तपासामध्ये उघड झाली आहे.
अटक केलेला आरोपींपैकी कुणालने स्वतःच्या सीमवरून फोन कॉल केला होता. त्या आधारे पोलिसांना तिन्ही आरोपींना अटक करण्यात यश आले.
सुप्रिया साहा यांच्या मुलाने त्यांच्याकडे लॉटरीच्या पैशाबाबत तगादा लावला होता. आईकडे वारंवार पैशांची मागणी करूनही ती कोणताच अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याचे पाहून मुलगा जय याने हत्येचा कट रचला होता. त्याला त्याची प्रेयसी शुक्ला पुरी हिने आयडिया दिली होती.
जय आणि शुक्ला या दोघांचे मागील दोन वर्षांपासून प्रेम संबंध आहेत. हे संबंध दृढ झाल्यानंतर दोघांनी घरच्यांकडील पैसे हडप करण्याचा प्लॅन आखला होता. याचदरम्यान जयच्या आईला 75 लाखांची लॉटरी लागली होती. या पैशांवर डोळा ठेवून दोघे गुन्हेगारी कट रचू लागले होते. मात्र त्यांचा हा कट पोलिसांनी उधळून लावत त्यांना बेड्या ठोकल्या.