मुंबई | 11 जानेवारी 2024 : हृतिक रोशनचे वडील आणि नामवंत अभिनेता दिग्दर्शक राकेश रोशन यांची फसवणूक करणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला अखेर तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने या अपंग आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्याने राकेश रोशन यांच्यासह अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याचावर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी कुमार शर्मा असे आरोपीचे नाव असून त्याने अन्य आरोपींच्या साथीने राकेश रोशन यांची ५० लाख रुपयांची फसवणूक केली होती. तोतया सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करून त्याने ही फसवणूक केली. मुंबई सत्र न्यायालय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी आरोपी अश्विनी कुमार शर्मा याला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावली. अपंग असल्याच्या कारणामुळे आरोपी शर्मा हा निकाल सुनावण्याच्या वेळेस दृकश्राव्य माध्यमामार्फत न्यायालयासमोर हजर राहिला होता. उच्च न्यायालयाने आरोपीला तशी परवानगी दिली होती.
राकेश रोशन यांची लाखोंची फसवणूक
आरोपी शर्मा व त्याच्या साथीदारांनी निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांची लाखोंची फसवणूक केली. एका निर्मात्याने केलेल्या तक्रारीमुळे वाद उद्भवल्यानंतर, त्या वादावर तोडगा काढण्याच्या बहाण्याने शर्मा याने राकेश रोशन यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच आपण सीबीआय अधिकारी आहोत, असेही त्याने रोशन यांना सांगितले.
ज्याने तक्रार केली तो निर्माता न्यायालयाबाहेर वाद मिटवण्यास तयार झाल्याने राकेश रोशन यांनी त्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला ५० लाख रुपये दिले होते. मात्र नंतर तो सीबीआय अधिकारी खोटा , तोतया असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि २०११ च्या ऑगस्ट मध्ये त्यांनी एसीबीकडे ( लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) धाव घेत तक्रार दाखल केली.
हे प्रकरण नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आले व रोशन यांना फसवणारा आरोपी शर्मा आणि आणखी एकाला अटक करण्यात आली. आरोपींनी फक्त राकेश रोशन यांचीच नव्हे तर इतर काही लोकांचीही फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले. अखेर याप्रकरणी न्यायालयाने त्यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.