नाशिक : नाशिकच्या शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अशोकस्तंभावर मंगळवारी पहाटेच्या वेळी एक अपघात ( Nashik accident ) झाला आहे. हा अपघात नाशिकमध्ये ( Nashik News ) जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. अशोकस्तंभ येथे असलेल्या श्याम स्वीटच्या दुकानात थेट शेटर तोडून शिरल्याचे समोर आले आहे. यामध्ये स्वीटच्या दुकानाचे मोठं नुकसान झाले आहे. याशिवाय एक वाडा देखील कोसळला आहे. पहाटेच्या वेळी झालेला अपघात पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. तर यातील कारचालकावर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पोलिस दलातील वाहन चालक आहे.
नाशिकच्या ग्रामीण पोलिस दलातील महेश विश्वास पवार हे कार चालवत होते. त्यांच्यावर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय टे गंभीर जखमी असून शासकीय जिल्हा रुग्णालयात त्यांचावर उपचार सुरू आहे.
महेश पवार हे नाशिकच्या ग्रामीण पोलिस दलात वाहन चालक आहे. ते कर्तव्यावर नसतांना हा अपघात झाला आहे. पहाटेच्या वेळी हा अपघात घडला असून त्यांनाही यामध्ये जबर मार लागला आहे.
हा अपघात होण्यामागील कारण काय आहे हे अद्याप कळू शकलेले नाहीत. मात्र, अपघातावरुन कार भरधाव वेगाने होती हे स्पष्ट होत आहे. श्याम स्वीटचे संचालक किसनदास वैष्णव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पवार हे मंगळवारी पहाटेच्या वेळी काळ्या रंगाची झेस्ट टाटा चारचाकी कार घेऊन अशोकस्तंभ येथून जात होते. त्याच वेळी त्यांचे कार वरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
याशिवाय या दुकानाचा बाजूलाच असलेला जुना वाडा देखील कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, स्वीटच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
दुकानातील मुख्य शेटर, काउंटर, फ्रीज यांसह खाद्यपदार्थ ठेवण्याचे कपाट आणि खाद्यपदार्थ यांचं मोठं नुकसान झाले आहे. यामध्ये कारची पुढील बाजूस अक्षरशः निकामी झाली आहे.
यामध्ये महेश पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचा लवकरच सरकारवाडा पोलिसांकडून जबाब घेतला जाणार आहे. त्यानंतर हा अपघात कसा झाला याबाबतची माहिती समोर येईल.
हा संपूर्ण अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघात हा नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरला असून यामध्ये आता गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर काही कारवाई होते का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.