लातूर : समोरुन येणाऱ्या वाहनाला साईड देताना लातूर-पुणे एसटी बस मुरुड जवळच्या बोरगावकाळे येथे पुलावरुन खाली कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. एसटी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस पुलाखाली जात उलटली. आज सकाळी दहाच्या सुमारास हा एसटी अपघात घडला आहे. या अपघातात एसटीमधील 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी 14 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना लातुरच्या शासकीय रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे. काही जखमी प्रवाशांवर मुरुड येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. लातूर-मुरुड हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
लातूर डेपोची ही बस पुणे-वल्लभनगरकडे आज सकाळी निघाली होती. बोरगावकाळे जवळ आल्यानंतर अरुंद रस्त्यावर पुढून येणाऱ्या वाहनाला साईड देताना चालकाचा ताबा सुटला. नेमकं याचवेळी स्टेअरिंग रॉड देखील तुटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बस रस्त्याखाली जाऊन उलटली.
या अपघातात बसचेही मोठे नुकसान झाले आहे. बसचा चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. जखमींमध्ये महिला आणि वृद्ध प्रवाशांचाही समावेश आहे. दुपारनंतर घटनास्थळावरून एसटी हटविण्यात आली.
बस हटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले आहेत. या अपघातामुळे साधारण दीड तास वाहतूक थांबविण्यात आली होती. सहा अॅम्बुलन्सद्वारे जखमींना लातुरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींवर मुरुड आणि ढोकी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर-मुरुड रस्ता हा अरुंद असल्याने नेहमीच अपघात होत असतात. या अपघाताने रस्ता रुंदीकरणाची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.