नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सावत्र आईने तिच्या सहा वर्षाच्या मुलीवर भयंकर अत्याचार केला आहे. या निदर्यी मातेचे कृत्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. जेवायला मागितले म्हणून या सावत्र आईने सहा वर्षाच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर उकळते तेल टाकले आहे. यात या चिमुरडीला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सावत्र आईच्या या भयंकर कृत्याचा सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी आईला पोलिसांनी अटक केली आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या ठाकूरगंज पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या शांतीनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. आरोपी महिलेने या मुलीला दत्तक घेतले होते. ही महिला या मुलीसह अत्यंत निदर्यीपणे वागत तिच्यावर अत्याचार करत होती. अखेर तिने क्रूरतेचा कळस गाठत या मुलीवर अमानवी अत्याचार केला आहे.
आरोपी महिलेच्या पतीचे लखनऊच्या कॅम्पबेल रोड येथे दुकान आहे. या दोघांना मूलबाळ होत नव्हते. यामुळे 7 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांनी या 6 वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले. 8 जुलै रोजी ते दुकानात असताना त्यांची मुलगी भाजल्याचे त्यांना समजले.
त्यांनी तात्काळ घरी धाव घेतली. यावेळी त्यांच्या बायकोने चुकून चहा तिच्यावर पडल्याचे सांगितले. मात्र, मुलीने सर्व हकीगत वडिलांना सांगितली. आईने कढईत उकळत असलेले तेल चिमट्याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकल्याचे मुलीने वडिलांना सांगीतल्यानंतर त्यांना पत्नीचे खरे रुप कळाले.
आपले कृत्य उघडकीस येताच महिला माहेरी पळून गेली. यानंतर पोलिसांनी तिचा शोध तिला अटक केलीय. विशेष म्हणजे या महिलेच्या पतीनेच याची तक्रार केली होती. उकळते तेल टाकल्याने मुलीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर इजा झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे.