Mumbai Crime : म्हणून त्या पाषाणहृदयी आईने केला अवघ्या चार दिवसांच्या बाळाचा त्याग…

| Updated on: Sep 06, 2023 | 11:52 AM

अवघ्या चार दिवसांच्या बाळाला टाकून त्याची आई निघून गेली. मात्र त्या बाळाला ज्या कपड्यात गुंडाळले होते, त्यावर लाँड्री स्टोअरचा टॅग होता, त्यावरून पोलिसांनी पुढील शोध सुरू केला.

Mumbai Crime : म्हणून त्या पाषाणहृदयी आईने केला अवघ्या चार दिवसांच्या बाळाचा त्याग...
Follow us on

मुंबई | 6 सप्टेंबर 2023  : आई-बाळाचं नात हे जगावेगळं आणि खूप प्रेमाचं, विश्वासाचं असतं. पण काही वेळा अशा घटना घडतात, ज्यामुळे नात्यांवरच शंका घेण्याची वेळ येते. अशीच एक घटना मुंबईतील भांडूपमध्ये घडली आहे. अवघ्या चार दिवसांच्या नवजात बाळाला टाकून गेलेल्या पाषाणहृदयी आईला (mother arrested) अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेपच्युन मॉल एरिआमधील एका इमारतीच्या पायऱ्यांवर ती २२ वर्षीय महिला तिच्या नवजात मुलीला (abandons newborn child) सोडून गेली होती. शनिवारी दुपारच्या वेळेस काही रहिवाशांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकायला आल्यावर हा प्रकार समोर आला. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत सूचना दिली. त्यानंतर त्या बाळाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली.

सीसीटीव्हीमध्ये बाळासह दिसली होती महिला

अवघ्या चार दिवसांच्या बाळाला ज्या कपड्यात गुंडाळण्यात आले होते, त्यावर एका लाँड्री स्टोअरचा टॅग होता. त्या आधारे पुढील तपास करण्यात आला असता लाँड्री मालकाने एका गृहनिर्माण संस्थेकडे बोट दाखवले. त्यानुसार पोलिसांनी ती सोसायटी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासायला सुरूवात केली असता एक महिला तिच्या हातातील बाळासह इमारतीतून बाहेर जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांचा शोध एका अपार्टमेंटपर्यंत आला जिथे तीन महिला एकत्र भाड्याच्या घरात रहात होत्या.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यापैकी एक फ्लॅटमेट अचानक वेगळी रहायला लागली, ती कोणाशीच बोलायची नाही.ती अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच या शहरात आली होती व एका हॉटेलमध्ये काम करत होती. पुडील तपासात पोलिसांना तिच्या बेडजवळ रक्ताचे डागही आढळून आले. अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता, तिने तिच्या कृत्याची कबुली दिली.

गेल्या आठवड्यात आपण एका मुलीला जन्म दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र या शहरात राहण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी आपण अद्याप धडपड करत आहोत. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देखील आपल्याकडे पैसे नाहीत. असे असतानाच एवढ्या लहान मुलीच्या पानलपोषणाचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न तिला पडला होता. प्रसूतीसाठी तिने चार दिवसांची सुट्टी घेतली होती. मात्र तिने अजून रजा वाढवली असती तर तिला कामावरून काढून टाकले असते. म्हणूनच तिने मुलीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि तिला इमारतीच्या पायऱ्यांवर तशीच सोडून आली. आरोपी महिलेचे 2021 मध्ये एका इसमाशी लग्न झाले, पण त्यांच्या कुटुंबियांना याची कल्पना नाही. मात्र तिचा नवऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. म्हणूनच तिने मुलीला सोडण्याचे ठरवले, अशी माहिती समोर आली आहे.