नवी दिल्ली : परीक्षेत नापास झाला (Fail in Exam) म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या हातावर काठीने फटके दिले. यानंतर काही वेळात विद्यार्थ्याची तब्येत बिघडली. विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू (Student Death) झाल्याची खळबळजनक घटना ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
बादलपूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बंबावड गावात एका खाजगी शाळेत ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खाजगी शाळेत शुक्रवारी पाचवीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत वर्गातील काही विद्यार्थी नापास झाले होते.
नापास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी हातावर काठीने दोन-दोन फटके दिले. शिक्षकांनी मारल्यानंतर काही वेळातच एका विद्यार्थ्याची तब्येत बिघडली. यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांना याबाबत माहिती देण्यात आली.
पालक आणि शिक्षकांनी त्याला नजीकच्या रुग्णालयात नेले. तेथून त्याला दिल्ली येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचार सुरु असतानाच शनिवारी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परीक्षेत नापास झाल्यानंतर शिक्षकांनी मुलाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असा आरोप मयत विद्यार्थ्याच्या आईने केला आहे.
घटनेनंतर आरोपी शिक्षत फरार झाला आहे. शिक्षकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पथक तयार करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.