नाशिक : आई-वडीलांनी शिक्षण घेण्यासाठी मुलांना महाविद्यालयात ( College Student ) दाखल केले होते. मात्र, शिक्षण बाजूला सोडून मुलांनी मोठा पराक्रम ( Crime News ) केल्याचे समोर आले आहे. मौजमजा करण्यासाठी कुठलाही काम धंदा करून पैसे न कमावता मोबाइल चोरण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रस्त्याने पायी जाणाऱ्या आणि विशेष म्हणजे मोबाइलवर बोलत असणाऱ्या व्यक्तीच्या हातातून मोबाइल हिसकावून पसार होण्याचा फंडा राबविल्याचे समोर आले आहे. पोलीसांच्या कारवाई अनेक गुन्हे उघडकीस आले असून महागडे 22 मोबाइल जप्त केले आहे.
ज्या रस्त्यांना गर्दी नाही. तिथे रस्त्याने पायी चालणारा व्यक्ती मोबाइलवर बोलतांना दिसला की त्याचा मोबाइल बळजबरीने हिसकावून पोबारा करणारी टोळीच नाशिक पोलीसांच्या हाती लागली आहे.
खरंतर काही दिवसांपूर्वी पाटील लेन परिसरात एका मॅग्नम हॉस्पिटलसमोरून पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल हिसकावून नेण्यात आला होता. त्यांनी सरकारवाडा पोलिसांत धाव घेत तक्रार दिली होती.
पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यामध्ये दुचाकी वरुन आलेल्या तिघांनी मोबाईल हिसकावून नेण्यात आला होता. त्यानुसार तपास करणे तसे अवघड होते.
नाशिकच्या गुन्हे शाखेने याबाबत तांत्रिक बाबींचा आधार घेत मोबाइल चोरांचा शोध घेतला. यामध्ये एकूण चार जणांच्या टोळीला अटक केली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे 22 मोबाइल आणि दुचाकी पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.
चौघेही संशयित आरोपी हे महाविद्यालयातील शिक्षण घेत आहे. मोबाइल चोरी करून ते विक्री करायचे आणि त्यातून आलेल्या पैशातून मौजमजा करायचे असे पोलीसांच्या तपासात समोर आले आहे. ही बाब महाविद्यालयीन वर्तुळात समजल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक पोलीसांच्या तपासात आत्तापर्यंत आठ गुन्हे उघडकीस आले आहे. चौघा संशयितांकडून 22 मोबाइल जप्त करण्यात आले आहे. जवळपास या मोबाईलची किंमत साडेचार लाखांच्या जवळपास आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
या गुन्ह्यात सिडको येथील चेतन निंबा परदेशी, पौर्णिमा बस स्टॉप येथील शशिकांत सुरेश अंभोरे, सिडकोतील विजय सुरेन्द्र श्रीवास्तव आणि पाथर्डी फाटा येथील निखिल अर्जुन विंचू या चौघांचा समावेश आहे.
गुन्हे शाखेच्या विजय धमाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यांच्या पथकात महेश साळुंके, विष्णू उगले, रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, प्रवीण म्हसदे, शरद सोनवणे, नाझिमखान पठाण, संदीप भांड, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मुक्तार शेख यांचा सहभाग होता.
दीड महिन्यातच त्यांनी मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरले आहे. यामध्ये कमी श्रमात जास्त पैसे मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी मोबाइल चोरीकडे आपला मोर्चा वळविला होता. या घटणेमुळे त्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे.