बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील दुय्यम निबंधक (Registrar) कार्यालयात मनसेचे जिल्हाध्यक्ष गेले होते. शेतकऱ्यांकडून दुय्यम निबंधक लाच घेतात, अशा काही तक्रारी त्यांच्याकडे आल्या होत्या. याचा जाब ते विचारत होते. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष (MNS District President) मदन राजे गायकवाड यांनी सहाय्यक दुय्यम निबंधक यांना मारहाण केल्याची घटना घडली. ११ नोहेंबर २०२० रोजी ही घटना घडली. यावेळी त्यांच्या टेबलवरील फाईलही फेकून दिली होती. चिखली पोलिसांनी गायकवाड यांच्यावर गुन्हा दखल केला.
या प्रकरणी न्यायालयात खटला चालला. न्यायालयाने मनसे जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दहा हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. दुसरा आरोपी ज्ञानेश्वर भुसारी याची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
काही दुय्यम निबंधक शेतकऱ्यांकडून फेरफारसाठी पैसे घेतात. काही ना काही त्रृटी काढतात. कागदपत्राची कमतरता आहे. इतके पैसे दिल्यास काम होईल. अन्यथा होणार नाही, असं सांगतात. त्यामुळं घाबरून जाऊन शेतकरी त्यांना पैसे देण्यास तयार होतात.
शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेतात. हे प्रकार सर्रास सुरू आहेत. असाच प्रकार चिखलीत सुरू असल्याची माहिती मदनराजे गायकवाड यांना मिळाली. त्यामुळं त्यांनी शेतकऱ्यांना त्रास का देतो, म्हणून जाब विचारला. दुय्यम निबंधकास मारहाण केल्याने मनसे जिल्हाध्यक्षास शिक्षा सुनावली.
शेतकऱ्यांसाठी लढण्याचे काम करत असल्याचं मदनराजे गायकवाड म्हणाले होते. शेतकऱ्यांची लूट सहन करणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. पण, निबंधकाला मारहाण केली. तसेच फाईल्स फेकल्या. त्यामुळे न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली. या घटनेमुळं राजकीय नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांशी वागताना सांभाळून राहावे लागणार आहे.