औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या 34 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली. औरंगाबाद शहरातील पाडेगाव येथील सैनिक कॉलनीत सोमवारी (9 ऑगस्ट) या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली. भाऊलाल हिरालाल वाणी (वय 34) असं गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
भाऊलाल हे मंडप डेकोरेशन करण्याचा व्यवसाय करायचे. मात्र, गेल्या 2 वर्षांपासून लॉकडाऊन असल्याने त्यांचा व्यवसाय बंद झाला होता. दरम्यान बँकेचे हप्ते थकल्याने बँक कर्मचाऱ्यांनी पैशांसाठी घरी तगादा लावला होता. यामुळे भाऊलाल आर्थिक अडचणीत सापडले होते. काही दिवसांपासून ते टोल नाका येथे काम करू लागले होते. रविवार रात्री घरातील सर्व सदस्य झोपेत असताना भाऊलाल यांनी राहत्या घरात मंडपच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
पहाटे बहिणीला ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ छावणी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी भाऊलाल याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Suicide due to financial crisis after corona lockdown in Aurangabad