मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने दहिसर हादरून गेलं आहे. घोसाळकर यांच्याच भागात राहणाऱ्या मॉरिस भाई याने गोळ्या झाडून हत्या केली. फेसबुकवर लाईव्ह जात त्याने गोळ्या मारत त्यांना संपवलं. घोसाळकर यांच्या हत्येनंतर मॉरिस भाई याने डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली. घोसाळकरांच्या हत्येनंतर आता दबक्या आवाजामध्ये वेगळीच चर्चा आहे. घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला तो नेमका कोणी केला? मॉरिस भाईने स्वत:ला खरंच संपवलं का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेली फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे.
मॉरिसने घोसाळकरांना गोळ्या घातल्याचं फुटेज कुठे समोर आलंय का? फक्त गोळ्या लागताना दिसल्या. त्या कोणी मारल्या हे दिसलंच नाही आणि मॉरिस स्वतः सराईत गुन्हेगार होता, तो आधीही तुरुंगात जाऊन आलेला आहे. मग तुरुंगात राहण्याची सवय असताना यावेळी त्याने आत्महत्या का केली असेल? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय.
बरं आत्महत्या केली आहे असं एकवेळ मानलं तरी त्याने स्वतःला चार गोळ्या झाडल्या? शक्य आहे का हे? माणूस पहिल्याच गोळीत अर्धमेला होतो, त्यात मॉरीसने स्वतःवर 4 गोळ्या कशा काय झाडल्या? भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज काही तासांत व्हायरल केले गेले, मग ह्यावेळी त्या मॉरीसच्या कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज एक रात्र उलटून गेली तरी का बाहेर येऊ दिलं जातं नाहीये?, असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दोघांच्या भांडणात तिसराच कोणीतरी आपला राजकीय मार्ग साफ करून गेलाय असं तर काही नाहीये ना? पोलिसांनी अगदी निःपक्षपाती चौकशी करायला हवी. तरचं महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळलेली प्रतिमा आणि पोलिसांची होत असलेली बदनामी थांबण्यास थोडीफार मदत होईल.
बरेच प्रश्न अनुत्तरित असल्याचं अंधारे म्हणाल्या.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसने गोळी चालवल्या की आणखी कोणी गोळ्या चालवल्या? त्या दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिली होती का? असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावर या प्रकरणाला वेगळं वळण तर नाही लागणार ना? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.