अहमदनगर : बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याकडून डीवायएसपींवर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. राहुरी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. या गोळीबारानंतर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके सुदैवाने बचावले आहेत. बडतर्फ अधिकारी सुनील लोखंडे आणि DYSP यांच्या झटापटीत गोळीबार झाला.
गोळीबार करणारा पुण्यातील बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील लोखंडे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोप करणाऱ्या एका महिलेला धमकावण्यासाठी सुनील लोखंडे आला होता. त्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर झालेल्या झटापटीत हा गोळीबार झाला.
पीडित महिलेच्या घरात मुलांना डांबून ठेवल्यानंतर हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या सर्व थरारात सुनील लोखंडेने थेट डीवायएसपींवर गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुनील लोखंडे हा पुणे पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होता होता. मात्र त्यांच्याविरोधात एका महिलेने तक्रार दिली होती. याप्रकरणी सुनील लोखंडे यांच्यावर नगर जिल्ह्यातील राहुरी इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने चिडलेल्या सुनील लोखंडे यांनी महिलेला धमक्या दिल्याचा आरोप आहे.
सुनील लोखंडे यांच्याविरुद्ध राहुरी तालुक्यातील महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल केल्यानंतर यासंदर्भात पीडित महिलेने जबाब दिल्यास आणखी अडचणी निर्माण होण्याची भीती बडतर्फ पोलीस अधिकारी लोखंडे यांच्या मनात होती. त्यामुळे आज सकाळी लोखंडे पीडित महिलेच्या घरात घुसल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यांनी त्याच्या जवळील रिव्हॉल्व्हर पीडित महिला आणि तिच्या २ मुलींवर ताणल्याचाही दावा करण्यात येत आहे.
यासंदर्भात माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे आपल्या फौजफाट्यासह पीडितेच्या घरी दाखल झाले. त्यावेळी दहशत निर्माण करण्यासाठी लोखंडेने हवेत 1 गोळी देखील झाडली. त्यानंतर चर्चेतून मार्ग काढू असे सांगून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बडतर्फ पोलीस लोखंडेने बंदुकीच्या निशाण्यावर धरलेल्या मुलांना, त्याच्या ताब्यातून सुखरूप बाजूला केले.
त्यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी बडतर्फ पोलीस लोखंडे यांच्यावर झडप घातली. त्यावेळी लोखंडे याने मिटकेंवर गोळी झाडली. सुदैवाने बंदुकीतून सुटलेल्या गोळीची दिशा चुकविल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बडतर्फ पोलीस अधिकाऱ्यास ताब्यात घेऊन, पुढील कारवाईकरिता राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. बडतर्फ पोलीस अधिकाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
संबंधित बातम्या