सोलापूर / सागर सुरवसे : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी कारवाईत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बार्शी शहर आणि तालुका पोलीस ठाण्यातील चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याबाबत एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस अंमलदार अशा चौघांना निलंबित करण्यात आलं आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही कारवाई केली आहे.
बार्शीत 5 मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. याप्रकरणी अक्षय माने, नामदेव दळवी या दोघांवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींना तात्काळ अटक करणे गरजेचे होते. मात्र पोलिसांनी अटक न केल्याने दुसऱ्या दिवशी या आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.
मुलीचे आई-वडिल याच तक्रारीसंदर्भात पोलीस ठाण्यात गेले होते. त्यामुळे मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधत आरोपींनी घरात घुसून सत्तार आणि कोयत्याने मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली असती, तर कदाचित हा हल्ला झाला नसता अशी टीका सर्वत्र होऊ लागली.
यानंतर बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलीस अंमलदार राजेंद्र मंगरुळे आणि बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सारिका गटकुल, पोलीस अंमलदार अरुण माळी अशा चार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले. कर्तव्यात कसूर करणे, आरोपींना अटक करण्यात विलंब करणे या कारणामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.