ठाणे / निखिल चव्हाण : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना ठाणे येथे उघडकीस आली आहे. आव्हाड यांच्या बॉडीगार्डच्या निधनाने एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अनंत करमुसे प्रकरणी आव्हाड यांचा हा बॉडीगार्ड आरोपी होता. सध्या ठाणे पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु होती. याच प्रकरणामुळे दबावातून त्याने जीवन संपवल्याची माहिती कळते. मृत्यूपूर्वी बॉडीगार्डने सोशल मीडियावर मी अपराधी नसल्याची पोस्ट केली होती. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.
काय आहे करमुसे प्रकरण?
स्थापत्य अभियंता आणि भाजपचा कार्यकर्ता असलेला अनंत करमुसे याने महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे याला आव्हाड यांच्या बंगल्यात आणून बेदम मारहाण केली होती. बंगल्यात अनेक जणांनी पोलिसांकडील फायबर काठी तुटेपर्यत मारहाण केली. काठी तुटल्यावर वेताचा बांबू, लोखंडी पाईप आणि कंबरेच्या पट्ट्याने चक्कर येईपर्यंत मारहाण केली. मारहाण होत असताना स्वतः जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते.
बेदम मारहाण केल्यानंतर करमुसे याला फेसबुकवरील ती पोस्ट डिलीट करायला लावली. नंतर ही पोस्ट चुकून पोस्ट केली, त्याबद्दल माफी मागतो, असा व्हिडिओ त्याच्याकडून रेकॉर्ड करुन घेतल्याचे करमुसे याने जबाबात म्हटले होते. यानंतर आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नंतर सर्वांची सुटकाही झाली होती.
यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यानंतर ही केस पुन्हा ओपन करण्यात आली. या केसमधील सर्व आरोपींची पुन्हा चौकशी करण्यात येत आहे. या आरोपींमध्ये आव्हाड यांच्या या बॉडीगार्डचाही समावेश असून, त्याचीही ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. ही चौकशी सुरु असतानाच बॉडीगार्डने जीवन संपवल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. ठाणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.