कोलकाता : पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील महेशतला येथे दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका घरातून आजी आणि नातवाचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. दोघांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महेशतला नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली. महेशतला भागात एका दुमजली घरातून 55 वर्षीय महिला आणि 7 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच जिंजिरा बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत माया मंडल या पती तारक, मुलगा शेखर आणि नातू सोनू यांच्यासह राहत होत्या. काही वर्षांपूर्वी शेखरचा घटस्फोट झाल्यामुळे नातू सोनू हा आजीसोबत राहत होता. शेखर शुक्रवारी कामानिमित्त बाहेर गेला होता. महिलेचे पती तारक मंडल आजारी असून, ते दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत होते. त्यामुळे खाली काय झाले ते कळलेच नाही.
स्थानिक आणि कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेचा मुलगा मानसिकदृष्ट्या खचला आहे. दुसरीकडे वृद्ध महिलेच्या पतीलाही अर्धांगवायू झाला असून, तो बराच काळापासून अंथरुणावर पडून आहे. मृत सोनूला शिकवण्यासाठी एक शिक्षक रोज घरी येत असे. नेहमीप्रमाणे आजही शिक्षक उप्पल मंडल घरी आला. घरी आल्यावर त्याला खालच्या मजल्याचा दरवाजा ओला दिसला. त्याने दरवाजा ढकलून आत पाहिले तर त्याला एक भयानक चित्र दिसले. त्याने तात्काळ शेजाऱ्यांना माहिती देऊन पोलिसांना कळवले.
या हत्येत कुटुंबातील व्यक्तीचाच हात असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. आजी आणि नातवाची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र हत्या झाली असेल तर हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरातून कोणतीही चोरी झाली नसल्याची माहिती मिळते. पोलीस हत्येमागची कारणे शोधत आहेत.