पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण असो किंवा वरळीत पहाटे घडलेला कार अपघात असो गेल्या काही महिन्यात राज्यात हिट अँड रनच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या मदमस्त लोकांमुळे सामान्य लोकांचा प्राण मात्र कंठाशी आला असून अनेक निरपराधांना हकनाक जीव गमवावा लागल्याच्या घटना गेल्या काही काळात घडल्या आहेत. ते सर्व कमी की काय म्हणून आता मुंबईतील वर्सोवा येथेही हिट अँड रनचे असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे. भरधाव वेगाने रस्त्यावरून SUV चालवत चालकाने वर्सोवा बीचवर झोपलेल्या दोघांना उडवलं. या दुर्दैवी अपघातात एकाचा मृत्यू झाला तर त्याचा साथीदार, दुसरा मित्र हा गंभीर जखमी झाला आहे.
मृत इसम हा रिक्षा चालक असून गरमीमुळे तो व त्याचा मित्र रविवारी वर्सोवा बीचवर येऊ झोपले होते. मात्र ती त्यांची अखेरची रात्र ठरली. या दुर्घटनेनंतर कारचालक व त्याचा मित्र दोघेही फरार झाले होते. पोलिसांनी त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत शोध सुरू केला. अखेर वर्सोवा पोलिसांनी दोन्ही आरोपींना इगतपुरी येथून अटक केली. रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
कारखाली चिरडून आरोपी फरार
गणेश यादव असे मृताचे नाव असून त्याचा मित्र बबलू गंभीर जखमी झाला. तर SUV चालक निखिल जावडे आणि त्याचा मित्र शुभम डोंगरे अशी आरोपींची नावे असून ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत गणेश यादव हा वर्सोवा येथील सागर कुटीर येथे राहत होता. घरात खूपच गरम होत असल्याने रविवारी रात्री गणेश आणि त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव वर्सोवा बीचवर झोपायला गेले होते. मात्र पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या SUVने बीचवर झोपलेल्या त्या दोघांना चिरडले.
त्यानंतर कारचालक आणि त्याचा मित्र दोघेही कारमधून खाली उतरले आणि त्यांनी गणेशला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची काहीच हालचाल झाली नाही. तेव्हा कारचालक निखिल आणि मित्र शुभ या दोघांनी घटनास्थळवारून तातडीने पळ काढला. तेथे जखमी अवस्थेतील बबलूला मदत करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला नाही. या अपघाताची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी गणेशला उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला. वर्सोवा पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत अपघातातील दोषींचा शोध सुरू केला. नंबरप्लेटच्या मदतीने वर्सोवा पोलिसांनी कार चालकाचा शोध घेत त्यांना अटक केली.
कारचालक निखिल जावडे (34) व शुभम डोंगरे या दोघांना इगतपुरीमधून अटक केली. निखिल हा एका कॅब सर्व्हिसचा डायरेक्टर असून शुभम त्याचा बिझनेस पार्टनर असल्याचे समजते. आरोपींना मंगळवारी अंधेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा केल्यानंतर काही तासांतच चालक आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली. सुरुवातीला ते दारूच्या नशेत दिसले नाहीत. मात्र, दोन्ही आरोपी दारूच्या नशेत होते की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर वाहन चालवण्यास परवानगी नाही, मात्र ही कार झोपडपट्ट्यांमधून जाणाऱ्या अरुंद वाटेने घुसली आणि समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या दोघांना चिरडलं.
नंबर प्लेटच्या आधारे केली अटक
या अपघातानंतर एका स्थानिक रहिवाशाने कारच्या नंबर प्लेटचा फोटो त्याच्या मोबाईल फोनमध्ये कॅप्चर केला होता. त्याच फोटोच्या मदतीने वर्सोवा पोलिसांना अपघाताच्या तीन तासांच्या आतच आरोपींना शोधता आलं. जावळे आणि डोंगरे यांनी त्यांच्या कॅब व्यवसायासाठी सतीशकडून कार भाड्याने घेतली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जावळे आणि डोंगरे एका ग्राहकाला सोडल्यानंतर मुंबईत आले आणि समुद्रकिनाऱ्यावरर पोहोचले तेव्हा ही घटना घडली, मात्र तिथे वाहनांना प्रवेश प्रतिबंधित आहे.