मुंबई | 17 डिसेंबर 2023 : तुम्ही प्रभाकर पणशीकर यांचे ‘तो मी नव्हेच’ हे नाटक पाहीले असेल, या नाटकामधील त्यांचे पात्र ‘लखोबा लोखंडे’ हे पात्र गाजले होते. या पात्रालाही लाजवेल असा महाठग ओदिशा पोलिसांना अखेर सापडला आहे. ओदिशाच्या एसटीएफने ( स्पेशल टास्क फोर्स ) एका सराईत भामट्याला अटक केली आहे. त्याचा कारनामा ऐकून पोलिस देखील आश्चर्यचकीत झाले आहेत. या महाठकाने कधी स्वत:ला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी, सैन्यातील डॉक्टर असल्याचे भासविले. त्याच्या जाळ्यात अनेक तरुणी फसल्या आणि लग्न करून बसल्याचे उघड झाले आहे. ओदिशा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कश्मीरसह सहा राज्यातील तरुणी फसल्या आहेत.
पोलिसांनी फसवणूकीच्या प्रकरणात कश्मीरातील एका तरूणाला अटक केली आहे. एसटीएफचे पोलीस महानिरीक्षक जे.एन.पंकज यांनी सांगितले की या तरुणाचे वय 37 असून त्याचे पाकिस्तान आणि केरळासह संशयित तत्वांशी संबंध आहे. एका गुप्त माहीतीच्या आधारे जाजपूर जिल्ह्यातील नेऊलपूर गावातून सैय्यद ईशान बुखारी उर्फ डॉ. ईशान बुखारी याला अटक केली. आरोपी सैय्यद ईशान बुखारी याने कधी स्वत:ला न्यूरो स्पेशलीस्ट, कधी आर्मी डॉक्टर, पीएमओ अधिकारी तर कधी एनआयएच्या अधिकाऱ्यांचा सहकारी असे भासविले. विशेष म्हणजे त्याच्याजवळ अमेरिकेतील कॉर्नेल युनिव्हर्सिटी, कॅनडाचे आरोग्य मंत्रालयाची मेडीकल डीग्रीचे खोटी प्रमाणपत्र होती.
आरोपी सैय्यद ईशाना बुखारी जम्मूच्या कुपवाडा जिल्ह्याचा रहीवासी असून त्याच्याकडून अनेक शपथपत्रे, बॉण्ड, एटीएम कार्ड, रिकामे धनादेश, आधारकार्ड आणि व्हीजिटींग कार्ड जप्त केले आहेत. आरोपीने कश्मीर, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि ओदिशासह भारतातील अनेक ठिकाणी किमान सहा ते सात लग्न केली आहेत. स्वत:ला आंतरराष्ट्रीय डीग्रीधारक डॉक्टर सांगून त्याने अनेक महिलांशी संबंध प्रस्थापित केले होते. अनेक वेबसाईट आणि एप्सचा वापर करून तो महिलांच्या संपर्कात होता. त्याच्यावर काश्मीरात देखील फसवणूकीचा गुन्हा दाखल असून अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्याची चौकशी आता पंजाब पोलीसही करणार आहे.