श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग (Target Killing)चे सत्र सुरु झाले आहे. शनिवारी पुलवामा जिल्ह्यात एक मोठी दहशतवादी (Terrorist) घटना घडली. रत्नीपोरा येथे दहशतवाद्यांनी दोन परप्रांतीय मजुरांवर गोळीबार (Firing) करून त्यांना जखमी केले. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. दोघेही मजूर मूळचे बिहारचे आहेत. याआधीही अनेकदा परप्रांतीय मजूरांना टार्गेट करण्यात आले आहे. त्यामुळे टार्गेट किलिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दहशतवादी हल्ल्यात दोन्ही मजूर गंभीर जखमी झाले. सुदैवाने त्यांच्या जीवावरचा धोका टळला आहे. सध्या दोन्ही मजूरांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही जखमी मजूर बिहारच्या बेतिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.
दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
काश्मीर झोन पोलिसांनी एका ट्विटमध्ये हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पुलवामाच्या खारपोरा रत्नीपोरा येथे दहशतवाद्यांनी दोन परप्रांतीय मजुरांना गोळ्या घालून जखमी केले.
दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बेतिया जिल्ह्यातील रहिवासी शमशाद आणि फैजान कासरी अशी मजूरांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाही परप्रांतीय मजुरांवर हल्ला केला गेल्याची घटना घडली होती. 5 ऑगस्टला पुलवामाच्या गदूरा भागात दहशतवाद्यांनी परप्रांतीय मजुरांवर ग्रेनेड फेकले होते. या दहशतवादी घटनेत एक मजूर ठार झाला, तर दोन जण जखमी झाले.
दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेला बिहारमधील मजूर होता. तीन वर्षांपूर्वी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द केले गेले होते. त्याला तीन वर्षे झाली, त्याच दिवशी परप्रांतीय मजुरांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता.