नाशिक : नाशिकच्या सिन्नर परिसरातील शिर्डी महामार्गावरील अपघात काही केल्या कामी व्हायला तयार नाहीये. यामध्ये एक धक्कादायक बाब म्हणजे सकाळच्या दरम्यानच अपघात होण्याची संख्या जास्त असून अनेक साई भक्तांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मागील पंधरवाड्यात झालेल्या अपघातात सिन्नर येथील सायकलवर जाणाऱ्या साई भक्तांना एका कारने चिरडले होते. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. ही घटना ताजी असतांनाच पुन्हा याच मार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. मुंबई येथील राहणारे साईभक्त हे शिर्डीला गेले होते, साईबाबांचे दर्शन करून ते त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला चालले होते. त्यातच सिन्नर ते शिर्डी राष्ट्रीय महामार्ग असलेल्या देवपुर जवळ सकाळी सात वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने तवेरा जीप उलटली आणि बाजूच्या खड्ड्यात जाऊन उलटली होती. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर सात साई भक्त गंभीर जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
भाईंदर आणि कल्याण परिसरात राहणारे मित्र परिवार हे साईबाबांच्या दर्शनाला मंगळवारी आले होते, त्यात शिर्डी येथे मुक्काम करून ते त्र्यंबकेश्वरला दर्शनसाठी निघाले होते.
शिर्डीहून पहाटेच निघालेल्या तवेरा जीपचा टायर देवपुर फाट्यावर चालू स्थितीत फुटला, तवेराचा वेग जास्त असल्याने जीप उलटली आणि दूर एका खड्ड्यात जाऊन उलट्या स्थितीत राहिली होती.
इंद्रदेव दया शंकर मोरया भाईंदर पूर्व आणि सत्येंद्र सुखराज यादव अंबरनाथ या दोघांचा गंभीर जखमी झाल्याने अपघात स्थळीच मृत्यू झाला आहे.
तर त्रिवेंद्र त्रिपाठी आणि रोहित मोरया या दोघांना अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या अपघातानंतर मृतांचे नातेवाईक सिन्नर येथे दाखल झाले होते, त्यात मृत तरुणांचे शवविच्छेदन केल्यावर नातेवाईकांच्या हाती मृतदेह देण्यात आले.
अपघाताचा पोलीसांनी पंचनामा केला असून याच महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.