मुंबई | 14 मार्च 2024 : शिक्षकांना देवाचं रुप मानलं जातं, पण काहीवेळ याच शिक्षकांचं दुसरं भीषण रूप समोर आलं तर ? अशीच एक धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबईतील गावदेवी परिसरातील एका शाळेत ही दुर्दैवी घटना घडली होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे, शाळेत समुपदेशनाचे सेशन आयोजित करण्यात आले तेव्हा त्या भेदरलेल्या विद्यार्थिनीने रडतरडत हा प्रकार उघड केला. महिनाभर या मुलीला हा त्रास सहन करावा लागत होता. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून गावदेवी पोलीस ठाण्यात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली.
समुपदेशनादरम्यान सांगितली आपबीती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलगी गावदेवी परिसरातील शाळेत शिकते. नुकतेच त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरू होते. त्यावेळी बोलताना, ती मुलगी अचानक रडायला लागली. समुपदेशकांनी तिला विश्वासात घेऊन नीट विचारपूस केली असता, तिने आपबीती कथन करत, तिच्यासोबत झालेल्या गैरप्रकाराची माहिती त्यांना दिली. आरोपी शिक्षकाने जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात पीडित मुलीचा सतत पाठलाग केला, तसेच तिचा विनयभंगही केला, असे तिने सांगितले. या प्रकरणामुळे ती विद्यार्थिनी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. मात्र भीतीमुळे तिने हा प्रकार कोणालाच सांगितला नाही. अखेर समुपदेशनादरम्यान तिने या प्रकार संबंधित समुपदेशकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या.