अहमदाबाद : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक. विद्यार्थ्यांच्या माध्यामातून देशातील भावी पिढी घडवण्याचे काम हे शिक्षकच करत असतात. वेळ प्रसंगी शिक्षक विद्यार्थ्यांना ओरडतात शिक्षा देखील करतात. मात्र, एका शिक्षिकीने किरकोळ कारणावरुन विद्यार्थ्याला इतकी भयानक शिक्षा केली आहे की या मुलाची किडनी सुजली आहे. गुजरातमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
गीर-सोमनाथ जिल्ह्यात एका सरकारी शाळेत हा गंभीर प्रकार घडला आहे. विद्यार्थी शाळेत उशीरा आल्याने शिक्षिकेच्या रागाचा पारा चढला. रागाच्या भरात या शिक्षिकीने विद्यार्थ्यांना अत्यंत क्रूर शिक्षा केली आहे.
पिडीत विद्यार्थ्यी हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. शिक्षीकेने केलेल्या शिक्षेमुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
शाळेत उशीरा आला म्हूणून शिक्षिकेने या विद्यार्थ्याला 200 उठाबशा काढण्याची शिक्षा केली. विद्यार्थ्याने न थांबता सलग 200 उठाबशा काढला. शरीरावर आणि पोटावर अत्यंत ताण आल्याने या मुलाच्या किडन्या सुजल्या आहेत.
घरी आल्यावर मुलाची प्रकृती बिघडली. मुलाला चालणेही कठिण झाले होते. मुलाला पाहून त्याचे कुटुंबिय हैराण झाले. त्याच्या घरच्यांनी तात्काळ त्याला रुग्णालायात नेले.
यावेळी तपासणी केली असता मुलाच्या किडन्यांना सुज आल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. सध्या या विद्यार्थ्यावर राजकोट येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अती उठाबशा काढल्यामुळे मुलाची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच त्याच्या वडिलांनी थेट शाळा गाठली आणि शिक्षा करणाऱ्या शिक्षिकेवर कारवाईची मागणी केली. या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी शिक्षण निरीक्षकांना दिले आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक डी.के. वाजा आणि शिक्षक यांनी मुलाला 200 उठाबशा काढल्याचा आरोप फेटाळला आहे.