सध्याच्या कलियुगात साध्या साध्या गोष्टींवरून वाद घालून, राग डोक्यात घालून लोकं भयानक पाऊल उचलतात. अगदी एकमेकांच्या जीवावरही उठतात. नागपूरमधून अशीच एक अतिशय भयानक आणि तेवढीच भीतीदायक बातमी समोर आली आहे. तेथे एका छोट्याश्या मुद्यावरून एका मुलाने त्याच्या आईसोबत असं काही केलं ज्याचा तुम्ही स्वप्नात देखील विचार केला नसेल. खरंतर 18 वर्षांच्या मुलाने फोन खरेदी करण्यासाठी आईकडे पैसे मागितले. पण तिने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने कथितरित्या तिला थेट तलवारच दाखवत धमकी दिली. सोमवारी पोलिसांनी ही माहिती दिली. नागपूरमधील जरीपटका पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, पीडित महिला रविवारी संध्याकाळी कामावरून परत आली. तेव्हा तिच्या मुलाने तिच्याकडे नवा फोन खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपये मागितले. मात्र सध्या पैशांची तंगी असल्याचे सांगत त्या महिलेने मुलाला पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. पण ते ऐकून तिचा मुलगा भडकला आणि त्याने त्याच्या जन्मदात्या आईशी गैरवर्तन सुरू केले. त्याने थेट तलवार काढत आई-बहिणीला धमकावलं. एवढंच नव्हे तर घरात तोडफोडही केली.
मुलाचा हा भयंकर अवतार पाहून महिला घाबरली आणि तिने तत्काळ पोलिसांत धाव घेत स्वत:च्याच मुलाविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या घटनेनंतर काही वेळातच मुलगा घरातून फरार झाला होता.
बकरीवरून वाद, मुलाने आईलाच पेटवलं !
आजकाल जऱ्याशा मुद्यावरून भडकून लोक वाट्टेल तसं पाऊल उचलत असल्याच्या बऱ्याच घटना सध्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये हत्येची एक भयानक घटना घडली होती. बकरी विकण्यावरून झालेल्या वादानंतर एका मुलाने त्याच्या जन्मदात्री आईलाच जिवंत जाळलं होतं, त्यात त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रिपोर्टनुसार, बाचारा गावात बकरी विकण्यावरून झालेल्या भांडणात एका ५० वर्षीय महिलेची तिच्या मुलाने निर्घृण हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. मृत कमलेश देवीच्या डोक्यावर तिच्या मुलाने जड वस्तून प्रहार करत तिला जखमी तेले. मात्र त्यानेही त्याचे मन भरले नाही आणि त्याने त्याच्या बेशुद्ध पडलेल्या आईच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत आईला जाळलं, असंही पोलिसांनी नमूद केलं. शरीराचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेने संपूर्ण गावच हादरलं होतं.