अंबरनाथ : अंबरनाथमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत एका चौकडीने टेम्पो चालकाला लुटल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेतील आनंदनगर एमआयडीसी भागातील सुदामा हॉटेलजवळ हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.
अंबरनाथमध्ये राहणारे वसंत सरगर यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते टेम्पोमध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जात होते. तिथून पुन्हा आनंदनगर एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ असलेल्या टेम्पो स्टॅंडवर जाण्यासाठी ते दुचाकीवरून निघाले.
यावेळी सुदामा हॉटेल जवळच रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या चार जणांनी त्यांना गाडी बाजूला घ्यायला सांगितली. यानंतर अंगावरील सोन्याची चैन, ब्रेसलेट आणि अंगठी हे दागिने एका कागदाच्या पुडीत बांधायला सांगितलं.
यानंतर ही पुडी व्यवस्थित बांधली आहे? की नाही? हे पाहण्यासाठी या चौघांनी हातात घेतली आणि लगेचच सरगर यांना परत देखील केली. त्यानंतर हे चौघे तिथून बदलापूरच्या दिशेने निघून गेले. काही वेळाने सरगर यांनी ही पुडी उघडून पाहिली असता त्यांना त्यामध्ये चक्क लाल माती भरल्याचं आढळून आलं.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठत याबाबतची तक्रार केली. सरगर यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत भामट्यांचा शोध सुरू केला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजपर्यंत पोलीस असल्याची बतावणी करून अशाच पद्धतीने चार जणांना लुबाडण्यात आलंय. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या भावाचा देखील समावेश होता.
विशेष म्हणजे आनंदनगर एमआयडीसी आणि पाईपलाईन रोड या भागातच हे गुन्हे घडले असून, यापैकी एकाही गुन्ह्याचा अद्याप शिवाजीनगर पोलिसांना छडा लावता आलेला नाही. त्यामुळे या भामट्यांची हिंमत वाढत चालली असून त्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचं आता बोललं जातंय.