ठाणे | 28 ऑक्टोबर 2023 : ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे अवघ्या १८ महिन्यांच्या, मुलाचं अपहरण करण्यात (kidnapping of small boy) आल्याने एकच खळबळ माजली आहे. दोन इसम थेट घरात घुसले आणि अवघ्या दीड वर्षांच्या त्या बाळाला उचलून घेऊन गेले. त्याची आई त्यांना अडवायचा प्रयत्न करत होती, पण त्यांनी काहीच ऐकलं नाही.
मात्र अपहरणकर्त्यांच नाव ऐकून तर पोलिसही चक्रावले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला
कोणी केलं अपहरण ?
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या चिमुरड्या मुलाचं त्याच्याच मावशीच्या नवऱ्याने अपहरण केलं. सरवर अली असं त्याचं नाव आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या बहिणीचे नवऱ्याशी, अली याच्याशी सतत वाद व्हायचे. भांडणामुळे ती पतीपासून वेगळी झाली होती. काही दिवसांपूर्वीच अली हा त्याच्या मेव्हणीकडे आला आणि त्याची पत्नी कुठे आहे, सध्या कुठे राहते यासंदर्भात तिच्याकडे चौकशी करू लागला. पण तिने त्याला काहीही सांगण्यास नकार दिला. त्यानंतर तो घरातून निघून गेला.
बदला घेण्यासाठी केले किडनॅप
तक्रारदार महिलेच्या सांगण्यानुसार, आरोपी अली आणि आणखी एक व्यक्ती बुधवारी कळवा येथील तिच्या घरात घुसले आणि तिच्या अवघ्या दीड वर्षांच्या मुलाला उचलून घेऊन गेले. त्याच्या पत्नीचा पत्ता सांगितला नाही याचा बदला घेण्यासाठीच अलीने हे कृत्य केल्याच आरोप पीडित महिलेने लावला आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं.