आजकालच्या जगात कोण काय करेल याचा काहीच नेम नाही. एखादी व्यक्ती दिसते तशी नसते. याचाच प्रत्यय मुंबईतील पोलिसांना आला आहे. एका चोराचे कारनामे ऐकून ते अवाक् झाले. चोरी करण्यासाठी तो चक्क विमानातून मुंबईला यायचा, पुलाखाली झोपायचा आणि चोरीचा कार्यभाग उरकून पुन्हा विमानाने मुंबईतून परत जायचा. त्याची ही अनोखी कहाणी ऐकून पोलिसही आश्चर्यचकित झाले.
ठाणे शहरात गेल्या काही दिवसांत बंद घरातील चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. नागरीकही जीव मुठीत धरून जगत होते. यामुळे ठाणे क्राईम युनिट 5 च्या अधिकाऱ्यांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला आणि एका इसमाला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने दिलेली माहिती ऐकून पोलिसही हक्काबक्का झाले.
चोरी करण्यासाठी त्रिपुराहून मुंबईत विमानाने यायचा अन्
त्याने दिलेल्या माहितीनुसार, तो चोर मूळचा त्रिपुराचा रहिवासी आहे. चोरी करण्यासाठी तो त्रिपुरा येथून चक्क विमानाने मुंबईत यायचा. त्यानंतर तो मुंबई, ठाणे, पालघर परिसरात राहून १५ दिवस रेकी करायचा. त्यादरम्यान एखाद्या पुलाखाली झोपायचा. एखादं बंद घर हेरून, त्याची रेकी करून तो संधी साधायचा आणि घराचे कुलूप तोडून हात साफ करायचा. चोरीचा बराचसा माल मुंबईतच विविध ठिकाणी विकून पैसे मिळाले की तो चोर पुन्हा विमानानेच परत पळून जायचा.
पोलिसांकडून तपास सुरू
त्याने दिलेली माहिती आणि चोरीची पद्धत ऐकून पोलिसही आश्चर्यचकित झाले. त्यानंतर ठाणे क्राईम युनिट 5 च्या अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून 60 ग्रॅम सोने, 250 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त केली. दरम्यान ठाणे शहरात झालेल्या 7 घरफोड्या, तसेच अंधेरी, विलेपार्ले येथेही चोरी केल्याचे त्याच्या चौकशीत उघड झाले आहे. एवढंच नव्हे तर त्याने राज्याबाहेर, गुजरातमध्येही काही शहारत हात साफ करत चोरी केल्याचे तपासात समोर येत आहेत. सध्या पोलिस त्याची अधिक चौकशी करत असून लवकरच त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.