ठाणे : पत्ता सांगितला नाही म्हणून शहरातील ढोकाळी गावात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपापसातील वादात दोन गट आमने सामने आल्याने ढोकाळी परिसरात काही काळ तणावाच वातावरण होतं. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी दहशत माजवणे, दंगल सदृश्य स्थिती निर्माण करणे याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सोहेल कुरेशी, आशिष जैस्वालसह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील कापूरबावडी परिसरातील ढोकाळी, टीएमसी शाळेच्या बाजूला काल रात्री 8.30 च्या सुमारास त्याच परिसरात राहणारा सोहेल कुरेशी नावाचा तरुण 7 ते 8 साथीदारांसह चार मोटर सायकल घेऊन आला. सोहेलने परिसरातील मटणाचे दुकान चालक अश्फाक शेख यांना “तू सोहेल शेख याचा पत्ता मला सांगत नाही, आता तुझीच मर्डर करतो” असे सांगत आपल्या इतर साथीदारांसह दुकान चालक अश्फाक शेख याला मारहाण सुरू केली. त्यानंतर चाकू कोयते आणि इतर धारदार हत्याराने त्याच्यावरती वारही करण्यास सुरुवात केली.
हा सर्व गोंधळ सुरू असतानाच त्यात परिसरामध्ये राहणाऱ्या काही तरुणांनी आपल्या शेजारच्या दुकान चालकाला कोणीतरी मारते हे पाहताच घटनास्थळी धाव घेतली. साहिल आणि त्यांच्या मित्रांना धक्काबुक्की करत घटनास्थळावरून पळण्यास भाग पाडले. या मारहाणीत दुकान चालक अश्फाक शेख गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला असून. पोलीस अधिक तपास करत आहे.