Thane Crime : असा मित्र असेल तर शत्रूंची काय गरज ? मित्रानेच मित्राला लुटलं, कारण ऐकाल तर म्हणाल..

| Updated on: Oct 05, 2023 | 12:34 PM

जिगरी दोस्तीच्या अनेक कहाण्या, किस्से आपण ऐकत असतो. अशा मित्रांचा आदर्शही डोळ्यांसमोर ठेवतो. पण मैत्रीच्या नावाला काळिम फासणारी, मान खाली घालायला लावणारी एक घटना समोर आली आहे. मित्रानेच मित्राचा विश्वासघात करत त्याचं नुकसान केल्याची ही घटना.. कुठे घडली पण ?

Thane Crime : असा मित्र असेल तर शत्रूंची काय गरज ? मित्रानेच मित्राला लुटलं, कारण ऐकाल तर म्हणाल..
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे | 5 ऑक्टोबर 2023 : ये दोस्ती हम नही तोडेंग… असं म्हणत मित्राच्या गळ्यात हात टाकून फिरणारे पडद्यावरचे जिगरी दोस्त (friendhsip) आपण पाहिले. यारों दोस्ती बडी ही हसीन है, गाणं म्हणताना आपल्या जिवलग मित्रांच्या आठवणीने कित्येक वेळा डोळे पाणावले असतील. मैत्री आणि मित्र… सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे. जीवाला जीव देणार, प्रसंगी पाठिशी ठामपणे उभा राहणारा, चूक झाली तर खडसावून सांगणारा आणि आपल्या आनंदात दिलखुलासपणे सहभागी होणारा एखादा तरी मित्र / मैत्रीण आपल्याकडे असावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

बहुतांश लोकांना असे मित्र मिळतातही. पण सगळेच मित्र हे आपले हितचिंतक असतातच असं नाही. आंब्याच्या पेटीत जसा एखादा नासका आंबा असतो, त्यामुळे इतरांनाही त्रास होऊ शकतो, तसाच एखादा कु-मित्रही असू शकतो. त्याच्यामुळे आपलं नुकसानही होऊ शकतं. असा मित्र असेल तर शत्रूची काय गरज, असा मित्र असण्यापेक्षा नसलेलाच बरा… असे असंख्य विचार येतात. मित्रानेच मित्राचा विश्वासघात करत त्याचं जबर नुकसान (crime news) केल्याची एक घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. काय घडलं नेमकं तिथे ?

असा मित्र नकोच..

एका मित्राने त्याच्याच मित्राच्या दुकानात चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याने आपल्याच मित्राच्या दुकानातील रोख रक्कम लुटून पोबारा केला. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसा त्याचा शोध घेत आहेत.

नेमकं काय झालं ?

उल्हासनगरमधील आर के टी कॉलेजच्या समोर चंदन वाधवा यांच एच के इलेक्ट्रॉनिक्स नावाचं दुकान आहे. काही कामानिमित्त चंदन वाधवा यांनी एका बॅगेत दीड लाख रुपये भरून ते केबिनमध्ये ठेवले होते. बाहेर ते ग्राहकांशी बोलत होते. मात्र केबिनमध्ये आल्यानंतर पैसे ठेवलेली बॅग गायब झाल्याचे पाहून ते हादरले. चोरीचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं मात्र त्यातील चोर पाहून तर त्यांना मोठा धक्का बसला.

वाधवा यांचा मित्र पंकज वलेचारा यानेच ही चोरी करत पैसे पळवल्याचे सीसीटीव्ही द्वारे स्पष्ट झाले. वाधवा बाहेर ग्राहकांशी बोलत असताना पंकज केबनिमध्ये घुसला आणि
पैशाने भरलेली बॅग चोरी करून फरार झाला. पंकज हा चंदनकडे इलेक्ट्रॉनिक सामानांची वाहतूक करत होत, त्यांची चांगली मैत्री होती. मात्र गणेशोत्सवादरम्यान जुगार खेळताना त्याने पैसे गमावले होते. त्याच पैशांसाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात येत होता. त्यापायीच त्याने मित्राचा दुकानात पैसे चोरल्याची माहिती समोर आली आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वाधवा यांच्या तक्रारीनंतर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.