बिहार : शिक्षेपासून वाचण्यासाठी एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने (Rape Accuse) जी शक्कल लढवली ते पाहून पोलिसही चक्रावून गेले. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी कथा बिहारमधील पिता-पुत्रांनी रचली. मात्र सत्य शेवटी उघड होतेच. त्याचप्रमाणे शिक्षेपासून सुटका मिळवण्यासाठी (To escape punishment) आरोपीने केलेला बनाव उघड झालाच. आरोपीची पोलखोल होताच आरोपीने भागलपूर कोर्टात आत्मसमर्पण (Surrender) केलं. नीरज मोदी असे या आरोपीचे नाव आहे.
आरोपी नीरज मोदीने गावातील एका अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य केले होते. मात्र जेव्हा पोलीस मोदीला अटक करण्यासाठी त्याच्या घरी दाखल झाले. तेव्हा त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला. या कटात मोदीचे वडिल राजाराम मोदींनीही त्याला साथ दिली.
राजाराम मोदी यांनी आपला मुलगा मयत झाल्याचे सिद्ध केले. तसेच जिवंत मुलाला चितेवर झोपवून त्याचा फोटो काढला. चितेसाठी लागणाऱ्या लाकडाचे खरेदी बिल बनवले. लाकडाच्या बिलाच्या आधारे मुलाचे मृत्यूपत्र बनवले. हे मृत्यूपत्र भागलपूर कोर्टात सादर केले. यानंतर कोर्टानेही आरोपीला मयत समजून खटला बंद केला.
मात्र पीडितेच्या आईने हार मानली नाही. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या चकरा मारत होती. तिला संशय होता की, आरोपी जिवंत आहे. पिडितेच्या आईने आरोपीच्या मृत्यूपत्रावर आक्षेप घेत बीडीओकडे याबाबत तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीनंतर बीडीओने या मृत्यूपत्राबाबत चौकशी सुरु करण्यात आली. चौकशीत आरोपीच्या वडिलांनी सादर केलेले मृत्यूपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाले. यानंतर आरोपीच्या पित्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
मृत्यूचा बनाव उघडकीस आल्याने आणि पित्याच्या अटकेनंतर आरोपी नीरज मोदीने स्वतःहून भागलपूर कोर्टात आत्मसमर्पण केले. ही घटना उघडकीस भागलपूरमध्ये सर्वच जण हैराण झाले आहेत.