दिल्ली : दिल्लीतील नांगलोई येथे 9 फेब्रुवारीपासून बेपत्ता झालेल्या 11 वर्षीय मुलीच्या हत्येचे रहस्य उलगडण्यास पोलिसांना यश आले आहे. मुलीच्या आईच्या फोनवर आलेल्या अज्ञात मिस्ड कॉलवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. रोहित उर्फ विनोद असे 21 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने घटनेची कबुली दिली असून, मुंडका गावातील घेवरा मोडजवळ मृतदेह सापडला होता. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.
चौकशीत हत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसून, घटनेपूर्वी आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्याची भीती पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मृत मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केल्यानंतर व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच आरोपींवर दोषारोप निश्चित केले जातील, असे पोलिसांनी सांगितले.
पीडित मुलगी नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजता शाळेत गेली होती. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने घरच्यांनी तिची शोधाशोध सुरु केली. बराच शोध घेऊन मुलीचा शोध न लागल्याने नातेवाईकांनी पोलिसात मिसिंग तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंद करत मुलीचा शोध सुरु केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या आईला चुकून कॉल केला होता. परंतु रिसिव्ह करण्यापूर्वीच तो कॉल डिस्कनेक्ट केला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी हा संशयास्पद क्रमांक ट्रेस केला. हा नंबर पंजाब आणि मध्य प्रदेशात फिरत होता. अशा परिस्थितीत पोलिसांनी विशेष पथक तयार करून या दोन्ही राज्यात छापे टाकले आणि आता 21 फेब्रुवारीला आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीने पोलिसांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली तर दिलीच, पण मुंडक्याच्या घेवरा वळणजवळ मृतदेह जप्त केला. 12 दिवसांपूर्वी खून झाला असल्याने मृतदेह कुजलेला अवस्थेत होता. मृतदेहाची स्थिती पाहता बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे दिसते.