मुंबई : बोरिवलीत घातपात घडवण्याच्या हेतूने दोन जण एका रिक्षातून आरडीएक्स घेऊन जात असल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. सूरज जाधव असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. चौकशीत सूरज जाधव याने आपण विनोद म्हणून हा फोन केल्याचे सांगितले. मात्र या फेक कॉलमुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे त्याच्यावर मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यात चोरी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीने असे का केले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
सोमवारी संध्याकाळी सूरज जाधव याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून पोलिसांची दिशाभूल केली. बोरिवलीत घातपात घडवण्याच्या हेतून एका रिक्षातून दोघेजण आरडीएक्स घेऊन चालले असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत तात्काळ तपासाला सुरुवात केली. पोलीस तपासात हा फेक कॉल असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्या इसमाचा शोध सुरु केला.
तपास करत असताना पोलीस सूरज जाधव नावाच्या तरुणापर्यंत पोहचले. पोलिसांनी तरुणाला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता आपण विनोद नावाने हा फेक कॉल केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र आरोपीने असे का केले याबाबत अद्याप कळू शकले नाही.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस पुढील तपास करत आहेत.