मुंबई / गोविंद ठाकूर : कामगारांनीच कारखान्यातील सोन्यावर डल्ला मारल्याची घटना बोरीवलीत उघडकीस आली आहे. सोने घेऊन कामगार पळून गेलेल्या आरोपीवर पोलिसांनी ट्रेनमध्येच झडप घातली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना पश्चिम बंगालमधील हावडा येथून अटक केली आहे. आरिफ सलीम शेख आणि सलमान सुकूर शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीने एकूण 95 ग्रॅम सोने चोरुन नेले होते. त्यापैकी 40 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. बाकी 55 ग्रॅम सोने कोणाला विकले आणि या प्रकरणात किती लोकांचा समावेश आहे, याबाबत एमएचबी पोलीस तपास करत आहेत.
बोरीवली पश्चिमेकडील वैशाली इंडस्ट्रीजमधील सोन्याच्या कारखान्यातून 28 फेब्रुवारी रोजी 95 ग्रॅम सोने घेऊन कारागीर फरार झाला. चोरी केलेले सोने तो पश्चिम बंगालला निघून गेला. सोने चोरी झाल्याचे लक्षात येताच मालकाने एमएचबी पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला.
एमएचबी पोलिसांनी तातडीने कारखान्यात पोहोचून सीसीटीव्ही तपासले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर आरोपी अहमदाबादमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतरही एमएचबी पोलीस अहमदाबादला पोहोचले. जेथे आरोपीचा शोध घेतला असता आरोपी सापडला नाही. आरोपीचे पुन्हा तांत्रिक विश्लेषण केले असता ते ठिकाण हावडा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तात्काळ विमानाने हावडा गाठले.
तेथे एमएचबी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी भेलपुरी वाल्याचा वेश परिधान करत ट्रेनच्या स्लीपर आणि जनरल डब्यांची तपासणी केली. मात्र आरोपी सापडला नाही. त्यानंतर एमएचबी पोलिसांनी थ्री टियर एसी कोचमध्ये आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी आरोपी तेथे दिसून आला. तक्रारदारानेही आरोपीला ओळखले. यानंतर एमएचबी पोलिसांनी आरोपीला अटक केली. यानंतर सोने खरेदी करणाऱ्या खरेदीदारालाही पोलिसांनी अटक केली.