नालासोपारा / विजय गायकवाड (प्रतिनिधी) : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने आपल्याच पार्टनर महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बेडमध्ये टाकून आरोपी फरार झाला होता. तुळिंज पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत आरपीएफच्या मदतीने गुजरात राजस्थानच्या बॉर्डरवरील नागदा रेल्वे स्थानकातून आरोपीला अटक केली. हार्दिक शहा असे आरोपीचे नाव असून, मेघा तोरबी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी हा सुशिक्षित बेकार असून, त्याची पार्टनर नर्सचे काम करीत होती. आरोपी कामधंदा करीत नसल्याने दोघात नेहमी वादविवाद होत होता. याच वादातून हत्या केली असल्याचे समोर आले आहे.
नालासोपारा पूर्व तुळिंज रोडवरील सीता सदन इमारतीत रात्री सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. घटनेची माहिती मिळताच तुळिंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
शवविच्छेदन अहवालात महिलेची गळा दाबून हत्या झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना महिला तिच्या लिव्ह पार्टनरसोबत राहत असल्याची माहिती मिळाली.
आरोपीने राहत्या घरात गळा दाबून हत्या करून, मृतदेह हा घरातील बेडमध्ये टाकला. त्यानंतर घरातील काही सामान विकून, त्यातून आलेले पैसे घेऊन आरोपी घरातून फरार झाला होता. ही हत्या दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आली होती.
काल सोमवारी घरातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले असता गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले. यावरून तुलिंज पोलिसांनी रात्री उशिरा हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीचा शोध घेतला असता आरोपी राजस्थानला रेल्वेने जात असल्याचे उघड झाले. तात्काळ पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणच्या आधारे आरोपीला ट्रेस करून, रेल्वे पोलिसांच्या मदतीने नागदा रेल्वे स्थानकात आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी कसून तपास केला असता लिव्ह पार्टनरसोबत सतत होत असलेल्या वादातून त्यानेच नर्स असलेल्या आपल्या पार्टनरची हत्या केल्याचे उघड झाले. आरोपी सुशिक्षित बेकार होता. काही कामधंदा करत नव्हता. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते.
याच वादातून आरोपीने गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह बेडमध्ये टाकून आरोपी फरार झाला. मात्र पोलिसांनी गुजरात राजस्थान बॉर्डरवरुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.