नाशिक : नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे शिवजयंतीच्या बैठकीत अध्यक्ष निवडीवरून शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट यांच्या मोठा राडा झाला होता. यावेळी गोळीबार झाल्याची घटनाही समोर आली होती. याबाबत दोन्ही गटाकडून आरोप करण्यात आल्यानंतर तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पहिला गुन्हा हा ठाकरे गटाच्या तक्रारीवर शिंदे गटावर करण्यात आला होता. यावेळी शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख राजू लवटे यांचा पुतण्या आणि माजी नगरसेवक असलेल्या सूर्यकांत लवटे यांचा मुलगा स्वप्नील लवटे याला पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर तीन दिवसांनी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि इतर दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिंदे गटानेही यावेळी हवेत गोळीबार करून कोयते आणि धारधार शस्र घेऊन राडा केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतांना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि इतर काही जण फरार आहे.
उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याची निपक्ष चौकशी व्हावी याकरिता या गुन्ह्याचा तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाकडे देण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांचा तपास सुरू करत असतांना या संपूर्ण राड्याचं सीसीटीव्हीच समोर आले आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू असलेल्यांच्या बाबत पोलखोल होऊ लागली आहे.
नाशिकच्या देवळाली येथील शिंदे आणि ठाकरे गटातील राड्याचं सीसीटीव्ही #nashik #cctv #firegun #shinde #thackeray pic.twitter.com/7tQd9bIikh
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) January 25, 2023
यामध्ये गोळीबार करण्याची दृश्य दिसून येत आहे, याशिवाय हातात कोयते घेऊन वावरतांना दिसून येत आहे. त्यामुळे योग्य तपास करण्यासाठी हा सीसीटीव्ही महत्वाचा भाग असणार आहे.
शिंदे गटाकडून दबाव वापरुन गुन्हा दाखल केल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली असून सीसीटीव्ही आता सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.
पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी माहिती मिळताच धाव घेतली होती. त्यानंतर पहिला गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला होता.
नाशिक शहरात शिंदे आणि ठाकरे गटात दाखल झालेल्या गुन्ह्यात सीसीटीव्ही समोर आल्याने आरोपांच्या बाबत खातरजमा होणार आहे, त्यामुळे पोलीसांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.