नवी दिल्ली : गुजरातमध्ये एका बंदरावर (Kandla Port, Gujrat) पुन्हा एकदा अतिप्रचंड प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. गुजरात कांडला बंदरावर अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तब्बल 350 किलो हेरॉईन (Heroin) जप्त करण्यात आलं आहे. कांडला बंदाराच्या गोदामात गुजरात एटीएस (Gujrat ATS) आणि डीआरआयनं केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांच्या मोठ्या साठ्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जवळपसा दोन हजार कोटी रुपयांचा हा साठा असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय अर्थमंत्रालयानं या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या साठ्याची आकडेवारीही जारी केली आहे. बुधवारी (20 एप्रिल) तर गुरुवारी (21 एप्रिल) रोजी मोठी कारवाई कांजला बंदरावर करण्यात आली होती.
या कारवाईदरम्यान, 17 कंटेनरमधून 10 हजार 318 जिप्समच्या गोण्या आणण्यात आल्या होत्या. त्यातून 3 लाख 94 हजार 400 किलो वजनाचा अंमली साठा जप्त करण्यात आलाय. या अंमली पदार्थाची वाहतूक उत्तराखंडच्या पांडरी सिसोनामधील बालाजी ट्रेडर्स कंपनीनं या मालाची वाहतूक इराणहून भारतात केली होती, अशी माहिती अमर उजालानं दिली आहे. इराणच्या अब्बास बंदरातून हा अंमली पदार्थांचा साठा आणण्यात आला होता.
इराणहून कांडला बंदरात आलेल्या 17 कंटेनरमध्ये खळबळजनक बाबी आढळून आल्या आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं याबाबतची धक्कादायक माहिती दिली आहे. इराणहून आलेल्या कांडला बंदरात तब्बल 205.6 किलो हेरॉईन जप्त असल्याचं समोर आलंय. याची किंमत अवैध बाजारात जवळपास 1 हजार 439 कोटी इतकं असल्याचं सांगितलं जातंय. तर 394 मेट्रीक टन जिम्पस पावडर आढळून आलीय.
The consignment arrived at Kandla Port from Bander Abbas port, Iran, imported in 17 containers has a gross weight of 394 MT & was declared as “gypsum powder”. So far, 205.6 kg of heroin, valued at Rs 1439 crores in the illicit market, has been recovered: Ministry of Finance
— ANI (@ANI) April 25, 2022
खरंतर ज्या अंमलीसाठ्यावर कारवाई करण्यात आली, तो साठा गेल्या सहा महिन्यांपासून बंदरावर पडून होता. बेवारस माल असल्याचं समजून हा साठा पडून असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये या गोण्या कांडला बंदरावर उतरवण्यात आल्या होत्या. गुजरात एटीएसला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी शोध मोहीम राबवून या साठ्यावर कारवाई केली आहे. दरम्यान, दिल्ली आणि पंजाबमध्ये या गोण्यातील साठा पोहोचवण्याचा कट रचला गेला होता, अशीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गुजरातच्या मुंदरा बंदरात तब्बल एकवीस हजार कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. हे प्रकरण बराचवेळ चर्चतही राहिलं होतं. टेल्कम पावडर नावानं हे ड्रग्स भारतात आणण्यात आलं होतं. तर आता जिप्सम पावडर नावानं पुन्हा भारतात आणलेल्या ड्रग्सवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.