नाशिक : नाशिकमधील एक अपघात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मद्यधुंद कारचालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याने चार जण जखमी असून दोघे गंभीर जखमी आहेत. मद्यधुंद कार चालक हा नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात प्राध्यापक असून त्याच्यावर आता ड्रंक अॅण्ड ड्राइव्हसह सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे मद्यधुंद कारचालकाची दोन दिवस झाले अजूनही नशा उतरली नाही. त्यातच चांडक सर्कल वरील कार चालकाचा बेदरकारपणे कार चालवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून पोलीसही चक्रावून गेले असून कारचालकाने अशी कोणती नशा केली होती याची चर्चा आता नाशिकमध्ये रंगू लागली आहे. त्यामध्ये संशयित साहेबराव निकम हा शुद्धीवर येत नसल्याने त्याला अटकही करता येत नसल्याने आणि चौकशी करता येत नसल्याने पोलिसांचा तपासही खोळंबला आहे.
संशयित प्राध्यापक साहेबराव निकम यांनी मद्यप्राशन करत कार मद्यधुंद अवस्थेत बेदकारपणे चालवल्याने तिचे टायर फुटले होते, तरीही कार चालक हा कार भरधाव वेगाने चालवत होता.
नाशिकरोड पासून इंदिरानगर मार्गे मुंबई नाका आणि नंतर चांडक सर्कल असा भरधाव वेगाने या मद्यधुंद कारचालकाने फक्त व्हीलवर प्रवास केला आहे.
यामध्ये आत्तापर्यंत त्याने आठ जणांना उडवल्याची माहिती समोर येत असून दोघांची परिस्थिती गंभीर आहे, त्यात एकाच्या पायावरुन गाडी चालवली आहे.
या मद्यधुंद कारचालकाचा पाठलाग पोलीस करत असतांना मुख्याध्यापक अवियनक्ष साळुंखे यांनाही उडवले, पुढे जाऊन पंकज मोरे याच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यात त्याचे दोन्ही पाय निकामी अवस्थेत गेले आहे.
जवळपास अर्धा ते पाऊन तासाचा हा थरार ठिकठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे, मात्र, चांडक सर्कलवरील व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडत आहे.
नाशिकमधील हा व्हिडिओ पाहून पोलिसांना प्रश्न पडला आहे की, या कारचालकाने अशी कोणती नशा केली आहे ? दोन दिवस होऊनही नशा उतरत नाहीये, त्यामुळे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
या मद्यधुंद कारचालकाने प्रथमच मद्यप्राशन केल्याची चर्चा आहे, त्यांच्या घरूनही याबाबत कुठलीही माहीती समोर आली नसल्याने नशेबाबतचं धुकं आणखी गडद झालं आहे.