केरळनंतर गुजरातमध्ये अंधश्रद्धेचे प्रकरण उघडकीस, पित्याने मुलीसोबत केले ‘हे’ भयंकर कृत्य

| Updated on: Oct 14, 2022 | 1:14 AM

आरोपीला त्याच्या मुलीला भुताने पछाडल्याचा संशय आला होता. याच संशयातून त्याने मांत्रिकाची मदत घेतली होती. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या बापाला आणि तिच्या काकाला अटक केली आहे.

केरळनंतर गुजरातमध्ये अंधश्रद्धेचे प्रकरण उघडकीस, पित्याने मुलीसोबत केले हे भयंकर कृत्य
झारखंडमध्ये कॉपी केल्याच्या संशयातून मुलीसोबत भयंकर कृत्य
Follow us on

अहमदाबाद : केरळपाठोपाठ गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात अंधश्रद्धेतून (Superstition) घडलेली हृदयद्रावक घटना उजेडात आली आहे. समाजात अजूनही अंधश्रद्धेमुळे अनेक निष्पापांना प्राण गमवावा लागत आहे. अशाच एका घटनेत बापाने पोटच्या निष्पाप मुलीची हत्या (Father Killed Daughter) केली आहे. तंत्रमंत्राच्या प्रभावातून मुलीच्या पित्याने आणि काकाने मिळून हे हत्याकांड (Murder) केले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा अजून किती बळी घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुलीला भुताने पछाडल्याचा आला होता संशय

आरोपीला त्याच्या मुलीला भुताने पछाडल्याचा संशय आला होता. याच संशयातून त्याने मांत्रिकाची मदत घेतली होती.याचदरम्यान करण्यात आलेल्या तंत्रमंत्रामुळे मुलीला प्राण गमवावा लागला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनाही मोठा धक्काच बसला आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या बापाला आणि तिच्या काकाला अटक केली आहे. आईच्या तक्रारीमुळे मुलीच्या हत्याकांडाला वाचा फुटली.

हे सुद्धा वाचा

नेमके प्रकरण काय घडले ?

गीर सोमनाथ जिल्ह्यातील तलाला येथील धवा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मृत मुलीचे वय 14 वर्षे असून ती इयत्ता नववीची विद्यार्थिनी होती. तिला भूताने पछाडल्याचे बोलले जात होते.

त्याच अंधश्रद्धेतून तिच्या बापाने आणि काकाने तिला उसाच्या मळ्यात बांधून बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला अन्न-पाणी न देता उपाशी ठेवले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

आरोपी भावांची तंत्रमंत्रावर प्रचंड श्रद्धा होती. तंत्रमंत्राच्या कृतीने भूत पळून जाईल, असा आंधळा विश्वास त्यांना होता. याच आंधळ्या विश्वासाने घात केला आणि एका निष्पाप मुलीला हकनाक प्राण गमवावा लागला.

आरोपींची पोलिसांसमोर दिली गुन्ह्याची कबुली

आरोपींनी अंधश्रद्धेतून अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृत मुलगी जवळपास 1 वर्षापासून तिचा मामा दिलीप अकबरीच्या घरी राहत होती.

1 ऑक्टोबर रोजी सुरत येथे राहणाऱ्या मुलीच्या काकाने मृत मुलीला भुताने पछाडल्याचे सांगितले. त्यानंतर तिची भुतबाधेतून सुटका करून घेण्यासाठी तंत्रमंत्राचा अवलंब करण्यात आला होता. याच अंधश्रद्धेतून मुलीला प्राण गमवावा लागला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या बापासह काकाला अटक केली आहे.आरोपींनी हत्याकांड केल्यानंतर पळ काढला होता. धक्कादायक म्हणजे, दोघांनी घटनेच्या रात्री मुलीचा मृतदेह शेतात जाळला.

यानंतर दुसऱ्या दिवशी सुरतमध्ये राहणाऱ्या मुलीच्या मृत्यूबद्दल तिच्या आईला माहिती मिळाली. तिने केलेल्या तक्रारीमुळे मुलीच्या हत्येमागील धक्कादायक सत्य उजेडात आले आहे.