डोंबिवली / सुनील जाधव : एका बार मालकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. रात्री बार बंद करुन घरी जात असताना चार आरोपींनी बियर देण्यास सांगितले. मात्र बार मालकाने “बार बंद झाला बिअर देऊ शकत नाही”, असे सांगितले. यामुळे संतप्त तळीरामांनी बार मालकाला बेदम मारहाण करत चाकूने जीवघेणा हल्ला केला. सुधाकर मुधु शेट्टी असे या बार मालकाचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात बार मालकाने चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामनगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
डोंबिवली पूर्व भागातील टिळक चौकातील यशवंत स्मृती जवळील सत्यम ड्रायफ्रुट दुकानासमोर सुधाकर मुधु शेट्टी यांचा बार आहे. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बार मालक दुकान बंद करुन घरी चालले होते. त्यावेळी त्याच परिसरात राहणारा सिध्दार्थ भालेराव आणि त्याचे तीन साथीदार आले. सिध्दार्थने शेट्टी यांच्याकडे बिअर बाटल्यांची मागणी केली.
“आता बार बंद झाला आहे. मी तुम्हाला बिअर देऊ शकत नाही”, असं बोलून मुधु शेट्टी घरी जाण्यास निघाले. मात्र संतप्त आरोपी सिध्दार्थने बार मालक शेट्टी याला पाठीमागून पकडत त्यांची मान आवळून त्यांना मारहाण करु लागले. या झटापटीत सिध्दार्थ याने जबरदस्तीने बार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकान उघडण्यास बार मालक शेट्टी यांनी विरोध केला.
संतापलेल्या माथेफिरू सिध्दार्थने आपल्या तीन साथीदारांसोबत मिळून बार मालकाला “तुला आता ठार मारतो” असं सांगत त्याच्या जवळील चाकूने शेट्टी यांच्या डोक्यात प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर बार बाहेर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहताच हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या घटनेत शेट्टी हे गंभीर जखमी झाले आहेत.